अमेरिकी शेअरबाजारातील चिनी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण

- 200 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाल्याचा दावा

विक्रमी घसरणवॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकी शेअरबाजारातील चिनी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण झाली. शुक्रवार, सोमवार व मंगळवार असे सलग तीन दिवस ही घसरण सुरू असून चिनी कंपन्यांना जवळपास 200 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचा दावा करण्यात येतो. चिनी कंपन्यांची ही घसरण 2008 सालानंतरचा सर्वात मोठा धक्का असल्याचे दिसत आहे. या कंपन्यांमध्ये चीनच्या माहिती तंत्रज्ञान व शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. चिनी कंपन्यांच्या शेअरबाजारातील या घसरणीमागे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने सुरू केलेली कारवाई हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते.

चीनच्या आठ सरकारी कंपन्यांसह सुमारे 250 कंपन्यांनी आतापर्यंत अमेरिकेच्या शेअरबाजारात नोंदणी केली आहे. या नोंदणीमागचा उद्देश अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उभा करण्याचा असल्याचे मानले जाते. चिनी कंपन्यांनी आतापर्यंत अशा नोंदणीतून जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्सचा निधी उभारण्यात यश मिळविले. चिनी कंपन्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकी शेअरबाजारांमधून निधी उभारीत असल्या तरी गेल्या काही वर्षात अमेरिकी प्रशासनाकडून त्यांच्यावर होणार्‍या कारवाईचे प्रमाणही वाढले आहे. ट्रम्प प्रशासनाने अनेक चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याबरोबरच विविध प्रकारचे निर्बंधही लादले होते. बायडेन प्रशासनाकडूनही चिनी कंपन्यांविरोधातील कारवाईचे सत्र कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या सत्ताधारी राजवटीने आपल्या कंपन्यांवर अमेरिकी शेअरबाजारातून माघार घेण्यासाठी दडपण टाकण्यास सुरुवात केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांविरोधात चीनने बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यात ‘अलिबाबा’, ‘दिदी’, ‘टेन्सेंट’ यासारख्या कंपन्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेऊन चीनने तंत्रज्ञान क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनाही मोठा धक्का दिला आहे. या धक्क्याचे तीव्र पडसाद शेअरबाजारातून उमटत आहेत.

विक्रमी घसरणगेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकदारांनी अमेरिकन शेअरबाजारांमधील चिनी कंपन्यांचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली होती. गेल्या आठवड्यापासून या हालचालींना अधिकच वेग आला असून शुक्रवारपासून तंत्रज्ञान क्षेत्रातील चिनी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील ‘नॅस्डॅक गोल्डन ड्रॅगन चायना इंडेक्स’मध्ये चीनच्या आघाडीच्या 100 कंपन्यांची नोंद आहे. हा इंडेक्स शुक्रवार, सोमवार व मंगळवार असे सलग तीन दिवस कोसळत आहे. तीन दिवसात 20 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घसरणीचे पडसाद चीनच्या हाँगकाँगमधील शेअरबाजारातही उमटले असून त्यातही चिनी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

तीन दिवसांच्या कालावधीच चिनी कंपन्यांना जवळपास 200 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचे सांगण्यात येते. फेब्रुवारी महिन्यापासून चालू असलेली घसरण लक्षात घेतल्यास चिनी कंपन्यांचे मूल्य जवळपास एक ट्रिलियन डॉलर्सने घसरल्याचा दावा प्रसारमाध्यमे व विश्‍लेषकांनी केला आहे. तर गेल्या तीन दिवसांमधील घसरण ही 2008 सालानंतरची सर्वात मोठी घसरण ठरली आहे. घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये ‘अलिबाबा’, ‘दिदी’, ‘टेन्सेंट’, ‘मेटुआन’, ‘जेडी डॉट कॉम’ व ‘बायडु’ यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील विश्‍लेषकांनी पुढील काळात चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा, असा सल्ला अमेरिकी गुंतवणुकदारांना दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनच्या आघाडीच्या कंपन्यांकडून भांडवलासाठी अमेरिकी शेअरबाजारांमध्ये होणारी नोंदणी रोखण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीने जोरदार हालचाली सुरू केल्याचे वृत्त समोर आले होते. यामागे अमेरिकेतील गुंतवणूक क्षेत्राला धक्का देऊन अधिकाधिक परदेशी गुंतवणुकदार आपल्या बाजूला वळविण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या तीन दिवसांमधील चिनी कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रमी घसरण लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply