सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून ‘आयएस’मध्ये दहशतवाद्यांची भरती सुरू

संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी विभागाचा इशारा

un vladimir voronkovसंयुक्त राष्ट्र – आयएसच्या दहशतवाद्यांपासून जागतिक सुरक्षेला असलेला धोका आजही कायम असून यामध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स तसेच ऑनलाईन माध्यमातून आयएस विद्वेषी प्रचार तसेच दहशतवाद्यांची भरती करीत आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख व्लादिमिर वोरोंकोव्ह यांनी दिला. आफ्रिकेतील साहेल तसेच मध्य आणि दक्षिण भागात या दहशतवादी संघटनेचा झालेला विस्तार अतिशय चिंताजनक असल्याचे वोरोंकोव्ह यांनी बजावले आहे.

video games beginsगेल्या काही दिवसांपासून ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना सातत्याने बातम्यांमध्ये आहे. जगभरातील आयएसचा प्रभाव दीर्घकाळासाठी आणि व्यापक प्रमाणात असेल, असे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने दोन आठवड्यांपूर्वी आपल्या अहवालात म्हटले होते. अफगाणिस्तानातील सौदी अरेबिया, युएई, चीन तसेच इतर देशांच्या दूतावासावर हल्ले चढविण्याची धमकी आयएसने दिली. यानंतर सौदी, युएई, पाकिस्तानने आपले दूतावास बंद केले होते.

याला काही तास उलटत नाही तोच तुर्की व सिरियाला हादरविणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाचा फायदा घेऊन आयएसच्या 20 हून अधिक दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन केल्याची बातमी आली. आयएसच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या हातावर अमेरिकन डॉलर्स टेकवून पळ काढल्याची माहिती समोर आली होती. तुरुंगात असलेल्या आयएसच्या दहशतवाद्यांकडे अमेरिकन डॉलर्स कुठून आले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण तुर्कीतील भूकंपाच्या बातमीमुळे दहशतवाद्यांच्या पलायनाकडे दुर्लक्ष झाले.

isis africaत्यातच आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी पथकाने या दहशतवादी संघटनेबाबत नवा इशारा दिला. 2014 साली इराक व सिरियामध्ये हाहाकार माजाविणारी ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना संपुष्टात आलेली नाही किंवा या संघटनेचा प्रभाव ओसरलेला नाही. इराक-सिरियाच्याही पलिकडे आयएसचा प्रभाव वाढत आहे, असा इशारा राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख वोरोंकोव्ह यांनी दिला. संघर्ष सुरू असलेल्या क्षेत्रात या दहशतवादी संघटनेचा धोका वाढत असल्याचे वोरोंकोव्ह यांनी राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर मांडलेल्या अहवालात सांगितले.

आयएस ही संघटना तंत्रज्ञानाचा वापर करीत असून इंटरनेट, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स तसेच ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म्स यांचा वापर करून विद्वेषी प्रचार आणि दहशतवाद्यांची भरती करीत आहे. त्याचबरोबर टेहळणी ड्रोन्स, आत्मघाती ड्रोन्स यांचा वापर करुन हल्ले चढवित आहेत. तर सोशल मीडिया व गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करुन ही संघटना पैसे गोळा करीत असल्याची माहिती वोरोंकोव्ह यांनी दिली.

दरम्यान, आफ्रिकेतील साहेल क्षेत्रासह, मध्य तसेच दक्षिण भागात या संघटनेने आपला विस्तार केल्याचेही वोरोंकोव्ह यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रसंघाच्या ‘युएनडीपी’ने दिलेल्या इशाऱ्यामध्ये बेरोजगारी आणि आर्थिक चणचणीचा सामना करणारे सब-सहारा आफ्रिकी देश दहशतवादाचे नवे केंद्र ठरत असल्याचे बजावले होते.

leave a reply