महाराष्ट्रात ११ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

निर्बंध शिथिलमुंबई – महाराष्ट्रात सातारा, सांगली, रत्नागिरीसह ११ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तीनच दिवसांपूर्वी याबाबतच निर्णय उच्चस्तरीय बैठकीत झाला होता. याबाबतची नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली. यानुसार निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये दुकाने रात्री आठपर्यंत सुरू ठेवता येतील. तर मुंबई, मुंबई उपवनगरात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

राज्यातील ११ जिल्हे वगळता कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. यामुळे अजूनही पाच टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्ह दर असणारे ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांना तिसर्‍या स्तरातील नियमातून सवलत देण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीन दिवसांपूर्वीच असा निर्णय झाल्याची माहिती दिली होती व अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे म्हटले होते. याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यानुसार निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येथील. शनिवारीही दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंदच राहणार आहे. तसेच हॉटेल्स सायंकाळ चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेचे कोरोना नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील व त्यानंतर पार्सल सेवा देता येईल. तसेच सलून, व्यायामशाळा, स्पा सेंटर्सही सोमवार ते शनिवारपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

मॉल, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळांवरील निर्बंध तसेच कायम राहणार आहेत. तसेच सभा, समारंभ, मिरवणुकांवरील बंदीही कायम असणार आहे. शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शालेय व उच्च शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात येईल, अशी माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंग यासारख्या नियमांचे पालन न करणे बंधनकारक असून तसे न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे.

निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दर अद्याप ५ टक्क्यांहून जास्त आहे. राज्यात सध्या सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर सर्वाधिक असून तो आठ टक्क्यांच्या पुढे आहे. तर गेल्या आठवड्यात सांगलीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये तिसर्‍या स्तराच्या निर्बंधातून कोणतीही सुट देण्यात आलेली नाही.

दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची सवलत का नाही? – मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

लसीकरण पुर्ण झालेल्या नागरिकांना लोकल रेल्वेतून प्रवासाची सवलत का देण्यात आलेली नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारला आहे. सध्या मुंबई, उपनगर व शेजारी ठाणे जिल्ह्यातील नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. तसेच लसीकरणही वेगाने सुरू असून महाराष्ट्रात कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तसे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सरकारला हा प्रश्‍न केला आहे. लसीकरण पुर्ण झाल्यानंतरही नागरिकांना घरातच थांबवे लागणार असेल, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.

leave a reply