रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर निर्बंधांची तयारी करणाऱ्या ब्रिटनचा सूड घ्या

- इराणच्या कट्टरपंथियांची मागणी

तेहरान/ब्रिटन – इराणने ब्रिटीश नागरिक अलीरेझा अकबरी यांना दिलेल्या फाशीनंतर ब्रिटनने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित करण्याची तयारी केली आहे. ब्रिटनच्या या हालचालींवर इराणमधून संताप व्यक्त होत आहे. इराणची सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या ब्रिटनचा सूड घ्या, इराणमधील ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचे जाळे उद्ध्वस्त करा, त्यांच्या एजंट्सची नावे जगजाहीर करा, अशी मागणी इराणमधील प्रभावी कट्टरपंथिय नेत्यांनी केली आहे.

‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स कॉर्प-आयआरजीसी’ अर्थात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स ही इराणच्या लष्कराची एक शाखा आहे. तरीही इराणच्या लष्कराहून कितीतरी अधिक अधिकार असलेली संघटना अशी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सची ओळख आहे. 1979 साली इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सची स्थापना झाली होती. इराकबरोबरच्या युद्धात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडल्यानंतर या संघटनेच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली होती. आज या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे स्वतंत्र नौदल, हवाईदल देखील आहे.

इराणच्या लष्कराकडे सीमेवरील तसेच देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. तर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स ही पूर्णपणे इराणचे सर्वाधिकार असलेल्या आयातुल्ला खामेनी यांच्यावर निष्ठा राखून आहे. त्यामुळे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स ही संघटना इराणच्या राजकीय व्यवस्थेची रक्षणकर्ती संघटना म्हणून ओळखली जाते. इराणमधील परदेशी हस्तक्षेप किंवा लष्करी उठावाची चिन्हे दिसल्यास त्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकार रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला देण्यात आले आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समधील कुद्स फोर्सेस, बसिज मिलिशिया या संघटनांनी आखातातील इतर देशांमध्ये लष्करी कारवाई करीत असल्याचे वारंवार उघड झाले होते. त्यामुळे इस्रायल, सौदी अरेबिया, बाहरिन आणि अमेरिका या देशांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

ब्रिटनने मात्र अद्याप रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर अशी कारवाई केलेली नाही. पण गेल्या आठवड्यात 14 जानेवारी रोजी इराणने माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा अकबरी यांना दिलेल्या फाशीनंतर ब्रिटन देखील रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित करण्याची तयारी करीत आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये तशी जोरदार मागणी होत आहे.

इराणचे माजी उपसंरक्षणमंत्री असलेले अलीरेझा अकबरी यांच्याकडे इराणसह ब्रिटनचेही नागरिकत्व होते. याचा फायदा घेऊन अलीरेझा यांनी इराणची सुरक्षाविषयक माहिती ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय6’ला पुरविल्याचा आरोप करुन इराणने अलीरेझा यांना फाशी दिली होती. यानंतर सावध झालेल्या ब्रिटनने दुहेरी नागरिकत्व असणाऱ्यांसाठी इराण सुरक्षित नसल्याचा इशारा दिला आहे. ब्रिटीश संसदेतील या मागणीनंतर युरोपिय महासंघाच्या संसदेतही 100 सदस्यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर निर्बंध लादण्याची मागणी केल्याची माहिती ब्रिटनच्या दैनिकाने दिली.

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याशी जवळीक असलेले धार्मिक नेते हुसेन शरियतमदारी यांनी युरोपमधील या घडामोडींवर संताप व्यक्त करून ब्रिटनचा सूड घेण्याची मागणी केली. ‘कयान’ नावाच्या आपल्या वर्तमानपत्रात शरियतमदारी यांनी ब्रिटनला अद्दल घडविण्यासाठी या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली असल्याचा दावा केला. ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचे इराणमधील जाळे, त्यांचे एजंट्स व सहाय्यक अशा सर्वांची नावे इराणने उघड करायला हवी. तसेच ब्रिटनबरोबरच इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादवरही अशीच कारवाई करावी, अशी मागणी शरियतमदारी यांनी केली आहे.

हिंदी

leave a reply