ऑस्ट्रेलियात ‘रोडन्ट प्लेग’ पुढची दोन वर्षे धुमाकूळ घालू शकेल -‘एनएसडब्ल्यू फार्मर्स’ गटाचा इशारा

‘रोडन्ट प्लेग’कॅनबेरा – ऑस्ट्रेलिया सरकारने ‘रोडन्ट प्लेग’ अर्थात उंदरांच्या साथीविरोधात तातडीने कारवाई केली नाही तर ही साथ पुढील दोन वर्षे देशभरात धुमाकूळ घालेल, असा गंभीर इशारा ऑस्ट्रेलियातील शेतकर्‍यांनी दिला आहे. सध्या सुरू असणार्‍या साथीमुळे ‘न्यू साऊथ वेल्स’सह इतर राज्यांमधील शेतकर्‍यांना पुढील हंगामासाठी पेरणीही करता येणार नसून त्याचा मोठा फटका अन्नधान्याच्या उत्पादनाला बसू शकतो, असेही ‘एनएसडब्ल्यू फार्मर्स’ या शेतकर्‍यांच्या गटाने बजावले. त्याचवेळी ग्रामीण भागात हाहाकार उडविणार्‍या उंदरांना रोखले नाही तर येत्या काही दिवसात सिडनी व मेलबर्नसारख्या शहरांमध्येही ‘रोडन्ट प्लेग’ पसरू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

‘रोडन्ट प्लेग’फेबु्रवारी महिन्यापासून ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असणार्‍या ‘न्यू साऊथ वेल्स’मध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आढळण्यास सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियातील ग्रामीण भागात यापूर्वीही उंदरांच्या साथी येण्याचा इतिहास असल्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र काही दिवसांमध्ये या उंदरांनी ‘न्यू साऊथ वेल्स’सह नजिकच्या इतर राज्यांमध्येही पसरण्यास सुरुवात केल्याने हाहाकार उडाला आहे. शेतकर्‍यांनी त्याचे फोटो तसेच व्हिडिओही प्रसिद्ध केले असून शेतापासून गोदामापर्यंत हजारो उंदरांच्या झुंडी त्यात दिसून आल्या आहेत.

‘रोडन्ट प्लेग’सुरुवातीला फक्त शेताचे नुकसान करणार्‍या उंदरांनी आता घरात घुसून माणसांचे तसेच पाळीव प्राण्यांचेही चावे घेण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागात रोगाच्या नव्या साथी फैलावण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचे रुग्णही वाढण्यास सुरुवात झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. ‘रोडन्ट प्लेग’मुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे तसेच अन्नधान्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजनांनंतरही हा प्लेग रोखण्यात शेतकर्‍यांना तसेच स्थानिक यंत्रणांना अपयश आले आहे.

‘रोडन्ट प्लेग’शेतीचे, घराचे व मालमत्तांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात आले असले, तरी ते पुरेसे नसल्याची टीका ‘एनएसडब्ल्यू फार्मर्स’ या शेतकर्‍यांच्या गटाने केली आहे. ‘सरकारकडून मिळणारे सहाय्य प्रत्यक्षात मिळण्यास बराच काळ जाणार आहे. उंदरांच्या वाढीचे चक्र तोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक जाणारा दिवस संकटाची व्याप्ती वाढविणारा असून असेच होत राहिले तर पुढील दोन वर्षे उंदरांचा धुमाकूळ सहन करावा लागेल’, असे ‘एनएसडब्ल्यू फार्मर्स’चे उपाध्यक्ष झेविअर मार्टिन यांनी बजावले आहे.

ऑस्ट्रेलियातील काही तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांनी ‘रोडन्ट प्लेग’ची साथ मोठ्या शहरांमध्येही हाहाकार उडवू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. अन्नधान्याची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून उंदरांच्या झुंडी सिडनी व मेलबर्न यासारख्या प्रमुख शहरांमध्ये पोहोचू शकतात, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. ऑस्ट्रेलिया सरकारने उंदरांसाठी घातक ठरणार्‍या ‘ब्रोमाडिओलोन’ या विषाची आयात केली असली, तरी त्याचे विपरित परिणाम शेती व पर्यावरणावर होऊ शकतात, असा इशाराही देण्यात येत आहे.

leave a reply