रशियाने इंधन व्यापारातील डॉलर व युरोचा वापर पूर्णपणे थांबविला आहे

- उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांचा दावा

मॉस्को – रशियाने इंधनव्यापारातील अमेरिकी डॉलर व युरो चलनाचा वापर पूर्णपणे थांबविला असून राष्ट्रीय चलनांवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे, असा दावा उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी केला. उपपंतप्रधान नोवाक यांनी यावेळी चीनबरोबरच्या इंधनव्यापाराचा उल्लेख करून या देशाबरोबरील व्यापार युआन व रुबल चलनात होत असल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’(आयईए) या आंतरराष्ट्रीय गटाने रशियाची इंधन निर्यात तीन वर्षातील सर्वोच्च स्तरावर पोहोचल्याचे जाहीर केले होते.

रशियाने इंधन व्यापारातील डॉलर व युरोचा वापर पूर्णपणे थांबविला आहे - उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांचा दावारशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. यात इंधनाचा दरांवर मर्यादा घालण्याबरोबरच परकीय गंगाजळी गोठविण्याच्या तरतुदीचाही समावेश होता. रशियाबरोबर इंधनव्यवहार करणाऱ्या अनेक देशांवर विविध प्रकारची दडपणे आणून त्यांना इंधनव्यापार बंद करणे अथवा घटविणे भाग पाडले होते. मात्र या कारवाईचा रशियायच्या इंधनक्षेत्रावर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने समोर येत आहे.

गेल्याच महिन्यात रशियाचे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांनी, रशियाने निर्बंध झुगारण्यात यश मिळविले असून इंधन निर्यात सुरळीत ठेवली आहे, अशी ग्वाही दिली होती. ‘पाश्चिमात्यांच्या निर्बंधांमुळे बाधित झालेले इंधन मित्रदेशांना निर्यात करण्यात आले आहे. रशियाच्या इंधनविक्रीत घसरण झालेली नाही’, असे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांनी सांगितले होते.

रशियाने इंधन व्यापारातील डॉलर व युरोचा वापर पूर्णपणे थांबविला आहे - उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांचा दावात्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने नवा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात मार्च महिन्यात रशियातून होणारी कच्च्या तेलाची निर्यात प्रतिदिन 81 लाख बॅरल्सवर पोहोचल्याचे सांगण्यात आले. ही गेल्या तीन वर्षातील सर्वोच्च पातळी असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्याचवेळी मार्च महिन्यात रशियाने इंधन निर्यातीतून 12.7 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळविला असून फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत त्यात तब्बल एक अब्ज डॉलर्सची भर पडल्याचे ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ सांगितले होते.

त्यापाठोपाठ आता रशियाच्या उपपंतप्रधानांनी रशियाने इंधनव्यवहारातून डॉलर व युरो हद्दपार केल्याचा दावा केला आहे. यामागे चीन व भारत या देशांनी मोठ्या प्रमाणात केलेली इंधन खरेदी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. त्याचवेळी ‘प्राईस कॅप’ लादणाऱ्या जी7 देशांपैकी जपाननेही रशियाकडून इंधन आयात कायम ठेवल्याचे समोर आले आहे.

leave a reply