रशियाकडून क्युबा व व्हेनेझुएलात लष्कर तैनात केले जाऊ शकते

- उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांचा इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका व मित्रदेशांनी रशियाच्या सीमेनजिक सुरू असलेल्या लष्करी हालचाली थांबविल्या नाहीत तर रशियादेखील लॅटिन अमेरिकेतील क्युबा व व्हेनेझुएलामध्ये संरक्षण तैनाती करु शकते, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला आहे. गेल्याच महिन्यात रिब्कोव्ह यांनी युक्रेनवरून निर्माण झालेल्या तणावाची तुलना ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’शी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, क्युबा व व्हेनेझुएलातील संरक्षणतैनातीबाबत केलेले विधान लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

रशियाकडून क्युबा व व्हेनेझुएलात लष्कर तैनात केले जाऊ शकते - उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांचा इशारारशियाने युक्रेन सीमेनजिक केलेल्या लष्करी तैनातीच्या मुद्यावर दोन्ही बाजूंमधील तणाव चिघळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये पार पडलेल्या तीन बैठकांमध्ये कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या बैठकांमध्ये अमेरिकेसह इतर पाश्‍चात्य देशांनी रशियाकडून करण्यात आलेल्या मागण्या फेटाळल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर उपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी, युक्रेन मुद्यावरील चर्चेत ‘डेड एन्ड’ आल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यापाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील तैनातीसंदर्भात केलेले वक्तव्य समोर आले आहे.

‘अमेरिका व मित्रदेश काय पावले उचलतात, यावर सर्व अवलंबून आहे. अमेरिका व मित्रदेशांनी रशियन मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर रशिया लष्करी पातळीवर मोठी पावले उचलू शकते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी हे आधीच स्पष्ट केले आहे. रशियाकडून क्युबा व व्हेनेझुएलात संरक्षण तैनाती होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळता येणार नाही’, या शब्दात रिब्कोव्ह यांनी लष्करी तैनातीबाबत इशारा दिला.

रशियाकडून क्युबा व व्हेनेझुएलात लष्कर तैनात केले जाऊ शकते - उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांचा इशारारशियाने यापूर्वी २०१८ व २०१९ मध्ये व्हेनेझुएलात लष्कर तैनात केल्याचे समोर आले होते. व्हेनेझुएलाने राजधानी कॅराकस जवळ असणारा विमानतळ रशियाला हवाईतळ म्हणून वापरण्याची परवानगी दिल्याचे दावेही समोर आले होते. रशियन बॉम्बर्स तसेच लढाऊ विमाने व्हेनेझुएलात उतरल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. रशिया व व्हेनेझुएलात संरक्षणतैनातीसंदर्भात करार झाल्याचेही सांगण्यात येते. क्युबा व रशियादरम्यानही २०१९ साली महत्त्वपूर्ण करार झाले असून, त्यात रशिया संरक्षणतळ सक्रिय करु शकतो, असे संकेत देण्यात आले होते.

रशियन मंत्र्यांच्या इशार्‍यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली आहे. रिब्कोव्ह यांची विधाने म्हणजे बढाया मारण्याचा प्रकार आहे, असा टोला अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी लगावला. त्याचवेळी रशिया २०१४ सालात वापरलेल्या डावपेचांची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असल्याचा दावाही सुलिवन यांनी केला. युक्रेनच्या लष्कराने रशियन तुकड्यांवर हल्ला चढविला, असे चित्र उभे करून युक्रेनवर आक्रमण करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी बजावले आहे. दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. या चर्चेत अमेरिकेने युक्रेनला संरक्षणसहाय्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच बायडेन प्रशासनाने युक्रेनला २० कोटी डॉलर्सची अतिरिक्त शस्त्रसामुग्री देण्यास मंजुरी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

leave a reply