रशियाच्या संरक्षणउद्योगाने क्षमता व वेग वाढविण्याची आवश्यकता

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को/किव्ह – बुधवारी रशियन संरक्षणदलाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, युक्रेनमधील संघर्षासाठी रशियन सरकार संरक्षणदलांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुतिन यांनी रशियाच्या संरक्षणनिर्मिती उद्योगाचे केंद्र असणाऱ्या ‘तुला’ला भेट दिली. यावेळी त्यांनी रशियाच्या संरक्षण उद्योगाचा भाग असणाऱ्या कंपन्यांनी शस्त्रनिर्मितीचा वेग तसेच क्षमता वाढवायला हव्यात, असे आवाहन केले. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे हे आवाहन रशिया युक्रेनमध्ये नव्या आक्रमणाची तयारी करीत असल्याच्या दाव्यांना दुजोरा देणारे ठरते.

गेल्या काही दिवसांमध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून सातत्याने बैठका व भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बेलारुसला भेट देऊन रशियाच्या लष्करी तुकड्यांची पाहणी केली होती. तसेच रशिया व बेलारुसमध्ये सुरू असलेल्या लष्करी सरावालाही भेट दिली होती. या भेटीत रशियाने बेलारुसमध्ये अतिरिक्त लष्करी तैनातीचेही संकेत दिले होते. त्यानंतर पुतिन यांनी रशियन गुप्तचर यंत्रणांची बैठक घेऊन त्यांना ‘इंटेलिजन्स गॅदरिंग’बाबत सूचना दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यापाठोपाठ बुधवारी रशियन राष्ट्राध्यक्षांनी संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दीर्घकालिन बैठक घेतली होती.

शुक्रवारी पुतिन यांनी रशियन संरक्षण उद्योगाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या तुला शहरातील विविध कारखान्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी कारखान्यांमध्ये सुरू असणाऱ्या शस्त्रनिर्मितीचा आढावा घेतला. त्यानंतर रशियन संरक्षणकंपन्यांना संबोधित करताना, युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन दलांना जलद व दर्जेदार शस्त्रपुरवठा व्हायला हवा असे आवाहनही केले. त्यासाठी रशियन कंपन्यांनी आपली क्षमता वाढवायला हवी, तसेच रशियन सैन्याला मिळणाऱ्या शस्त्रे तांत्रिकदृष्ट्या वरचढ असायला हवीत, असे निर्देशही दिले. रशियन संरक्षण उद्योगाने युक्रेनमध्ये लढणाऱ्या तुकड्यांना आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवायला हव्यात, या शब्दात त्यांनी युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होणार असल्याचे संकेतही दिले.

बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, रशियन सरकार व जनता संरक्षणदलांना कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्याचवेळी युक्रेन संघर्षासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीवर कसलीही मर्यादा नसून संरक्षणदलांना आवश्यक त्या सर्व गोष्टी मिळतील, असेही पुतिन म्हणाले होते. रशियाच्या संरक्षणदलांची क्षमता पाच लाखांनी वाढवून ती १५ लाख जवानांपर्यंत नेण्यात येईल, असेही बैठकीदरम्यान सांगण्यात आले होते. ‘सरमाट’ अण्वस्त्र व ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या तैनातीबाबतही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी रशियाच्या संरक्षण कंपन्यांना दिलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

गेल्या आठवड्यात युक्रेन, ब्रिटन तसेच पाश्चिमात्य माध्यमांनी रशिया नव्या आक्रमणाची तयारी करीत असल्याचे दावे केले होते. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठका व त्यातून समोर आलेल्या वक्तव्यांमुळे त्याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

leave a reply