युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाकडून सुमारे दोन लाख जवान तैनात

-अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाकडून युक्रेन सीमेवरील लष्करी तैनाती वाढविण्यात येत असून युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाने पावणेदोन लाख जवान तैनात केल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. रशियाने हे दावे फेटाळले आहेत. अमेरिका युक्रेननजिकच्या भागातील परिस्थिती भडकविण्याचा व त्याची सर्व जबाबदारी रशियावर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले. त्यापूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनीही, अमेरिका व नाटोच्या हालचालींमुळे युरोपात लष्करी संघर्षाचा धोका वाढला असल्याचा इशारा दिला.

अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने गुप्तचर अधिकार्‍यांच्या हवाल्याने रशियन तैनाती व आक्रमणाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘रशियाने २०२२च्या सुरुवातीलाच युक्रेनवर आक्रमणाची योजना आखली आहे. गेल्या वर्षी रशियाने युक्रेन सीमेवर लष्करी सराव केला होता. सरावासाठी तैनात केलेल्या जवानांपेक्षा दुप्पट जवान सध्या युक्रेन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत’, असे गुप्तचर अधिकार्‍यांनी सांगितल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे. अमेरिकी दैनिकाने काही सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले असून त्यात वाढलेली रशियन तैनाती दाखविण्यात आली आहे.

रशियन लष्कराचे १०० बटालियन टॅक्टिकल ग्रुप्स युक्रेनच्या सीमेवर असून त्यात जवळपास एक लाख ७५ हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे. तैनातीत रणगाडे, तोफा, सशस्त्र वाहने व इतर संरक्षणयंत्रणांही समाविष्ट आहेत. पुढील काही दिवसांमध्ये बटालियन टॅक्टिकल ग्रुप्स युक्रेनच्या सीमेच्या दिशेने पाठवून माघारी आणले जातील व त्यातून अनिश्‍चिततेचे वातावरण तयार केले जाईल, असा दावाही अमेरिकी यंत्रणांकडून करण्यात आला आहे. ही माहिती समोर येत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला चढवू नये म्हणून नवा ‘प्लॅन’ तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

अमेरिकी दैनिकाने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने केलेल्या दाव्यांवर रशियाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘युक्रेनभोवतीच्या परिस्थितीचा भडका उडावा म्हणून अमेरिका विशेष मोहीम राबवित असल्याचे दिसत आहे. भडका उडाल्यास त्याची सर्व जबाबदारी रशियावर ढकलण्याची तयारी झाली आहे. रशियाच्या सीमेजवळ चिथावणीखोर कारवाया सुरू असून एकापाठोपाठ एक आरोपांचा मारा करण्यात येत आहे’, या शब्दात परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिआ झाकारोव्हा यांनी प्रत्युत्तर दिले. त्यापूर्वी स्टॉकहोममध्ये झालेल्या बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनीही अमेरिकेवर निशाणा साधला.

‘अमेरिका व नाटोने रशियन सीमेनजिक आपल्या लष्करी यंत्रणा तैनात केल्या आहेत. लवकरच अमेरिकेची मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे युरोपात तैनात होण्याचेही संकेत आहेत. हा घटनाक्रम युरोपात लष्करी संघर्ष भडकण्याचा धोका वाढल्याचे दर्शवितो’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतच लॅव्हरोव्ह यांनी सदर धोक्याकडे लक्ष वेधले. त्याचवेळी अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनीही रशियाला लक्ष्य करून, युक्रेनवर आक्रमण केलेच तर रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

leave a reply