रशिया-इराणमधील सहकार्य आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांसाठी धोकादायक

- ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांचा इशारा

आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांसाठीवॉशिंग्टन – ‘इराणने रशियाला पुरविलेल्या ड्रोन्समुळे युक्रेनी मारले जात आहेत. याच्या मोबदल्यात रशिया देखील इराणला लष्करी सहाय्य पुरविण्याची तयारी करीत आहे. रशिया-इराणमध्ये हे सहकार्य प्रस्थापित झाले तर आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांसाठी ते युक्रेनपेक्षाही अधिक धोकादायक ठरेल’, असा इशारा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी दिला. इस्रायलच्या माजी राजदूतांनीही इराण-रशिया सहकार्य इस्रायलसाठी धोकादायक असल्याचा दावा केला.

रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात इराणचे आत्मघाती ड्रोन्स रशियन लष्कराला सहाय्य करीत आहेत. इराणचे ड्रोन्स युक्रेनमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत असून यामुळे वीजपुरवठा बाधित झाला आहे. त्याचबरोबर येथील अणुप्रकल्प, रुग्णालयांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप अमेरिका व युरोपिय देश करीत आहेत. तरअमेरिकेने इराणविरोधात खोटेपणा आणि कपटाने अपप्रचार सुरू केल्याचा ठपका इराणने ठेवला. जगभरात इराणविरोधात विनाकारण भीती निर्माण केली जात असल्याची टीका इराणने केली आहे.

अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना इराणवर नव्याने ठपका ठेवला. ‘रशिया-इराणमधील लष्करी सहकार्याचे थेट परिणाम युक्रेनच्या युद्धभूमीत दिसत आहेत. हजारो निष्पाप युक्रेनी या सहकार्यामुळे मारले जात आहेत. हे सहकार्य असेच सुरू राहिले तर येत्या काळात आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी ते युक्रेनपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकते’, असे बर्न्स यांनी बजावले.

आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांसाठीरशिया-इराणमधील या सहकार्य अमेरिका अतिशय गांभीर्याने घेत असल्याचे बर्न्स म्हणाले. अमेरिकेला वगळून रशियाबरोबर सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या सौदी अरेबिया, युएई या आखाती मित्रदेशांना सीआयएच्या प्रमुखांनी हा इशारा दिल्याचे दिसते. विशेषत: लवकरच इस्रायलची सूत्रे हाती घेणाऱ्या बेंजामिन नेत्यान्याहू यांना उद्देशून बर्न्स यांनी ही विधाने केल्याचे संकेत मिळत आहेत.

इस्रायलचे रशियामधील माजी राजदूत अर्काडी मिल-मन यांनी स्थानिक इस्रायली वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही इराण-रशिया सहकार्य इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा दिला. ‘इराणने रशियाला ड्रोन्स पुरविले आणि स्वतंत्र ड्रोननिर्मिती प्रकल्प उभारला, म्हणून हे सहकार्य धोकादायक ठरत नाही. तर रशियाने इराणच्या अणुकार्यक्रमासाठी सहकार्य केले तर ते इस्रायलच्या सुरक्षेसाठी अधिक धोकादायक ठरेल’, असा दावा मिल-मन यांनी केला.

दरम्यान, सीआयएचे प्रमुख बर्न्स आणि इस्रायलचे माजी राजदूत मिल-मन यांनी काही तासांच्या अंतराने जवळपास एकसारखाच इशारा दिला आहे. नेत्यान्याहू यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रशिया-युक्रेनने चर्चेद्वारे हा संघर्ष रोखावा, असे आवाहन नेत्यान्याहू यांनी केले आहे. तसेच या युद्धात आपण कुणाचीही बाजू घेणार नसल्याचे नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत, रशियाविरोधी युद्धात इस्रायलचे समर्थन मिळविण्यासाठी अमेरिकेकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. किंबहुना युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाची राजनैतिक कोंडी करण्याच्या प्रयत्नांविरोधात इस्रायलच्या नव्या सरकारने जाऊ नये, यासाठी बायडेन प्रशासन विशेष दक्षता घेत असल्याचे यामुळे समोर येत आहे.

leave a reply