भारताबरोबरील व्यापार वाढविण्यासाठी रशिया उत्सुक आहे

रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा

नवी दिल्ली – रशियाचा चीनबरोबरील व्यापार सुमारे २०० अब्ज डॉलर्स इतका असून हा व्यापार संतुलित आहे. भारताबरोबर रशियाला आपला व्यापार प्रचंड प्रमाणात वाढवायचा आहे. यासाठी रशिया आपल्या ‘युरेशियन इकॉनॉमिक कमिशन’द्वारे मुक्त व्यापारी करार करण्यासाठी उत्सुक आहे. याबरोबरच द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक वाढविण्यासाठी रशिया स्वतंत्रपणे प्रयत्न करीत आहे’, असे भारताच्या भेटीवर आलेले रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी म्हटले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची उपपंतप्रधान मंतुरोव्ह यांनी भेट घेतली. यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आत्ताच्या काळात भारताचा रशियाबरोबरील व्यापार रशियाच्या बाजूने अधिक झुकत असल्याचे सांगून रशियाने भारतासाठी आपली बाजारपेठ खुली करावी, असे आवाहन केले.

trade with Indiaयुक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या इंधनाच्या खरेदीत प्रचंड प्रमाणात वाढ केली. याचा द्विपक्षीय व्यापारावर सकारात्मक परिणाम झाला असून २०२२-२३च्या वित्तीय वर्षात भारत व रशियामधील व्यापार जवळपास ४० अब्ज डॉलर्सवर गेला. मात्र या व्यापारात फार मोठा असमतोल असून रशियातून भारताला केल्या जाणाऱ्या निर्यातीचे प्रमाणात यात फार मोठे आहे. याची जाणीव परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांना करून दिली. उभयपक्षी व्यापारात समतोल साधण्यासाठी रशियाने भारताला आपल्या बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यावेळी केले.

तर रशियाचे उपपंतप्रधान मंतुरोव्ह यांनी युरेशियन इकॉमिक कमिशन या संघटनेच्या अंतर्गत भारताबरोबर मुक्त व्यापारी कराराचा पुरस्कार केला. यासंदर्भात आपली भारताशी चर्चा सुरू असल्याची माहिती मंतुरोव्ह यांनी दिली. युरेशियन इकॉनॉमिक कमिशनमध्ये रशिया, बेलारूस, कझाकस्तान, किरगिझिस्तान आणि आर्मेनिया हे देश आहेत. त्यामुळे हा मुक्त व्यापारी करार संपन्न झाल्या, भारताचा मध्य आशियाई देशांमध्ये दबदबा वाढले. दोनच दिवसांपूर्वी भारत इराणमध्ये छाबर बंदराच्या विकासासंदर्भात बैठक पार पडली होती. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर इराणच्या या बंदराचा वापर करून भारत रशियासह या मध्य आशियाई देशांमध्ये सहजपणे मालवाहतूक करू शकेल. त्या पार्श्वभूमीवर, रशियाच्या उपपंतप्रधानांनी केलेल्या विधानांचे महत्त्व वाढले आहे.

विशेषतः चीनबरोबर २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करणारा रशिया भारताबरोबरही इतक्या प्रचंड प्रमाणात व्यापार करण्यासाठी उत्सुक असल्याचे रशियाचे उपपंतप्रधान सांगत आहेत. मात्र केवळ भारतीय रुपयांमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात व्यवहार होऊ शकणार नाहीत, असे उपपंतप्रधान मंतुरोव्ह यांनी म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रशिया ब्रिक्सच्या स्वतंत्र चलनाची मागणी करून यासाठी इतर सदस्यदेशांकडे आग्रह धरत असल्याचे उघड झाले होते. यावर भारताने अद्याप अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ब्रिक्सचे हे चलन डॉलरचा प्रभाव संपुष्टात आणू शकेल, असे दावे केले जातात. मंतुरोव्ह यासाठी भारताशी चर्चा करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply