नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांसाठी रशिया नुकसानभरपाई मागू शकतो

- परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा

मॉस्को – गेल्या वर्षी ‘नॉर्ड स्ट्रीम’ या इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांसाठी रशिया नुकसानभरपाईची मागणी करु शकतो, असा दावा परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांनी विरोध केला तरी रशिया या प्रकरणात स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करील, असेही दिमित्रि बिरिशेव्हस्की यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील आघाडीचे पत्रकार सेमूर हर्श यांनी, जर्मनीला धक्का देण्यासाठी बायडेन प्रशासनाने नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनी उडवून देण्याचे आदेश दिले, असा खळबळजनक दावा केला होता.

नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांसाठी रशिया नुकसानभरपाई मागू शकतो - परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा‘नॉर्ड स्ट्रीम’ ही रशियाकडून युरोपला इंधनवायूचा पुरवठा करणारी मुख्य इंधनवाहिनी आहे. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या इंधनवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करण्यात आला होता. युरोपिय देशांनी निर्बंध उठविले तरच पुरवठा सुरू करु, अशी आक्रमक भूमिका रशियाने घेतली होती. तर ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनी बांधून तयार असली तरी नव्या जर्मन सरकारने परवानगी नाकारल्याने त्यातून पुरवठा सुरू झालेला नव्हता.

इंधनपुरवठा बंद असतानाही सप्टेंबर 2022च्या अखेरच्या आठवड्यात रशिया व युरोपिय देशांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतून गूढ इंधनगळती उघडकीस आली होती. या गळतीप्रकरणी नाटो व युरोपिय महासंघाने रशियावर ठपका ठेवला होता. तर रशियाने यामागे अमेरिकाच असल्याचा आरोप केला होता. नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांसाठी रशिया नुकसानभरपाई मागू शकतो - परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावायुरोपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले तर त्यात अमेरिकेलाही संशयित म्हणून सामील करावे, अशी मागणीही रशियाकडून करण्यात आली होती. मात्र युरोपिय देशांनी त्याला नकार दिल्याने स्फोटांभोवतालचे गूढ अधिकच वाढले होते.

या पार्श्वभूमीवर, गेल्या महिन्यात पुलित्झर पुरस्कार विजेते अमेरिकी पत्रकार सेमूर हर्श यांनी आपल्या वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध केला होता. ‘हाऊ अमेरिका टूक आऊट द नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन’ असे या लेखाचे नाव होते. यात त्यांनी अमेरिकी यंत्रणांनी नॉर्वेसह इतर नाटो देशांचे सहाय्य घेऊन ‘नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन’ उडवून दिल्याचा गौप्यस्फोट केला. बायडेन प्रशासनाने त्यांचे हे दावे फेटाळत हर्श यांचा लेख म्हणजे ‘फिक्शन’ असल्याचे म्हटले होते. तर हर्श यांच्या लेखाचा आधार घेऊन सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याची मागणी रशियाने केली होती. हर्श यांच्या लेखामुळे ‘नॉर्ड स्ट्रीम’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून रशिया व पाश्चिमात्य देशांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

हिंदी English

 

leave a reply