रशिया मध्य आशियाई देशांबरोबर स्थानिक चलनातील व्यापार वाढविणार

स्थानिक चलनातील व्यापारबिश्केक – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना शह देण्यासाठी रशियाने विविध पर्यायांचा वापर सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून शेजारी व सहकारी देशांबरोबर स्थानिक चलनातील व्यापार वाढविण्यावर रशिया भर देत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन’च्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

‘आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संरचनेत होणारे बदल व जागतिक पुरवठा साखळीची फेररचना या पार्श्वभूमीवर युरेशियन इकॉनॉमिक युनियनमधील सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थांचे सार्वभौमत्त्व महत्त्वाचे ठरते. त्यासाठी परस्परांमधील व्यापारी व्यवहारांमध्ये राष्ट्रीय चलनांचा वापर प्रस्तावित करण्यात येत आहे’, असे निवेदन ‘युरेशियन इंटरगव्हर्मेंटल कौन्सिल’कडून प्रसिद्ध करण्यात आले.

रशियाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन’मध्ये पाच देशांचा समावेश आहे. रशिया, कझाकस्तान, किरगिझिस्तान, बेलारुस व आर्मेनिया हे त्यातील सदस्य देश आहेत तर उझबेकिस्तान, मोल्दोवा व क्युबा हे निरीक्षक देश म्हणून सहभागी आहेत. हा गट म्हणजे रशियन राजवटीकडून एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या देशांना आपल्या प्रभावाखाली ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला जातो.

‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन’ व्यतिरिक्त भारत व चीनचा सहभाग असलेल्या ‘ब्रिक्स’मध्येही रशियाने अमेरिकन डॉलरचा वापर टाळून स्थानिक चलनांमधील व्यवहारासाठी आग्रही भूमिका घेतली होती. युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसण्याच्या ऐवजी रशिया आर्थिकदृष्ट्या अधिकच बळकट होत असल्याची चिंता काही अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून रशियाने चीन व भारतासारख्या देशांबरोबर स्थानिक चलनांमध्ये व्यवहार सुरू केले असून आता युरोशियन युनियमच्या सदस्यदेशंबरोबरील अशा स्वरुपाच्या व्यापाराची व्याप्ती रशिया वाढवित आहे.

leave a reply