नाटोचा प्रतिकार करण्यासाठी रशिया युरोपिय देशांजवळ 20 युनिट उभारणार – रशियन संरक्षणमंत्र्यांची घोषणा

मॉस्को – येत्या वर्षअखेरीपर्यंत रशियाच्या पश्‍चिमेकडे, अर्थात पूर्व युरोपिय देशांच्या सीमेजवळ 20 युनिट उभारणार असल्याची घोषणा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई सोईगू यांनी केली. ‘गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या बॉम्बर विमानांच्या रशियाच्या हद्दीजवळील वाढलेली गस्त, पूर्व युरोपिय देशांमध्ये नाटोचा सुरू असलेला युद्धसराव आणि तैनाती आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा नष्ट करणार्‍या ठरत आहेत. नाटो सदस्य देशांच्या या कारवायांना प्रतिकार करण्यासाठी रशियाला हे पाऊल उचलावे लागत आहे’, असे सांगून रशियन संरक्षणमंत्र्यांनी अमेरिका व नाटोला जबाबदार धरले.

नाटोचा प्रतिकार

गेल्या काही आठवड्यांमध्ये रशिया व नाटोमधील तणाव वाढला आहे. युक्रेनच्या डोन्बासमधील संघर्ष, त्यानंतर अमेरिका, नाटो तसेच तुर्कीने युक्रेनच्या हवाई व सागरी हद्दीत केलेली तैनाती यामुळे या क्षेत्रात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. याशिवाय नॉर्वेच्या सागरी क्षेत्रातही रशिया आणि ब्रिटनच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या गस्ती वाढल्या होत्या. नाटो सदस्य देशांच्या या लष्करी हालचालींवर रशियन संरक्षणमंत्र्यांनी टीका केली.

तसेच येत्या वर्षअखेरीपर्यंत वेस्टर्न मिलिटरी डिस्ट्रिक्ट अर्थात रशियाच्या पश्‍चिम सीमेजवळ 20 लष्करी युनिट उभारण्यात येतील. या लष्करी युनिटचे स्वरुप काय असेल, ते संरक्षणमंत्री शोईगू यांनी स्पष्ट केले नाही. पण रशियन संरक्षणमंत्र्यांची ही घोषणा अमेरिका व युरोपिय देशांसाठी इशारा ठरते. येत्या काही दिवसात नाटोची विशेष बैठक पार पडणार असून त्यामध्ये यावर पडसाद उमटू शकतात. दरम्यान, एप्रिल महिन्यात युक्रेनचा प्रश्‍न निवळल्यानंतर रशियाने आपले सैन्य माघारी घेतले होते. पण आपला शस्त्रसाठा युक्रेनच्या सीमेजवळच ठेवला होता. येत्या सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या झॅपड युद्धसरावासाठी सदर शस्त्रसाठा तिथेच ठेवलेला असल्याचा खुलासा रशियाने दिला होता. पण अमेरिका आणि नाटोने रशियाच्या या हालचाली संशयास्पद असल्याचे आरोप करीत आहेत. युक्रेनबाबत रशियाने स्वीकारलेली आक्रमक भूमिका कधीही मान्य करता येणार नाही, असा ठपका ठेवून अमेरिकेने रशियाबरोबरील ‘ओपन स्काईज् ट्रीटी’त सहभागी होण्यास नकार दिला होता.

नाटोचा प्रतिकारअसे असले तरी अमेरिका व रशियन राष्ट्राध्यक्षांची बैठक नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल, असे अमेरिकेने जाहीर केले होते. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आपला देश नाटोबरोबर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले. त्याआधी नाटोने काही प्रश्‍नांची उत्तरे तयार?ठेवलेली बरी, अशी अपेक्षा रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. रशिया-नाटो काऊन्सिलची स्थापना ज्या सुरक्षाविषयक संवादाच्या मुद्यावर झाली, त्यावर दोन्ही बाजूंनी लक्ष केंद्रीत करायला हवे, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले.

या बैठकीचा वापर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांसाठी केला जाऊ नये, अशी मागणीही रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियावर निर्बंध लादण्याचा काहीच परिणाम झालेला नाही, हे लक्षात आणून देऊन नाटोने रशियाबरोबर संवादाची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन केले होते.

leave a reply