पाश्‍चिमात्य देशांच्या कठोर निर्बंधांनंतरही रशियन चलन रुबलचे मूल्य पूर्वपदावर

मॉस्कोे – फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई केल्यानंतर पाश्‍चिमात्य देशांनी रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणार्‍या कठोर निर्बंधांची घोषणा केली होती. या निर्बधांमुळे रशियन चलन रुबलच्या मूल्यात अभूतपूर्व घसरण झाली होती. पाश्‍चिमात्य नेतृत्त्वाने यासाठी आपली पाठही थोपटून घेतली होती. मात्र रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याच्या पाश्‍चिमात्य देशांच्या इराद्यांना सुरूंग लागला असून रुबल पुन्हा एकदा भक्कम स्थितीत आला आहे.

रुबलचे मूल्यफेब्रुवारीत सुरू झालेल्या संघर्षानंतर रशियन चलन रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत जबरदस्त घसरले होते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका डॉलरसाठी तब्बल १५० रुबल्स मोजणे भाग पडत होते. मात्र अवघ्या महिन्याभरात रशियन चलनाने युक्रेन संघर्षापूर्वी असलेली पातळी गाठण्यात यश मिळवले आहे. गुुरुवारी पार पडलेल्या व्यवहारांमध्ये एका डॉलरसाठी ७५ रुबल्स अशी नोंद करण्यात आली. रुबलने गाठलेली ही पातळी म्हणजे अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांना चपराक असल्याचे मत रशियन विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

रुबलचे मूल्यरशियाच्या मध्यवर्ती बँकेने केलेल्या जलद हालचाली व कठोर निर्णय यामुळे रुबल पूर्वपदावर आल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेने गेल्याच महिन्यात परदेशी नागरिकांवर रशियन मालमत्ता विकण्यास बंदी घातली होती. त्यापाठोपाठ निर्यातदारांना रोख चलन खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. रशियन कंपन्यांना त्यांच्याकडील ८० टक्के परदेशी चलन रुबल्समध्ये रुपांतरित करण्यास सांगितले होते. त्यापाठोपाठ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक वटहुकूम काढून, रशियाशी मैत्री न राखणार्‍या देशांना इंधनव्यवहारांसाठी रुबलचा वापर करणे बंधनकारक केले.

या उपाययोजना सुरू असतानाच युरोपिय देशांकडून रशियन इंधनाची खरेदी सुरूच होती. त्यामुळे व्यापारात रशियाची बाजू वरचढ राहिली व त्याचा फायदा रुबलला मिळाला, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. इंधनव्यवहार रुबलमध्ये काढण्याच्या निर्देशांवर युरोपिय महासंघाने नाराजी दर्शविली असली तरी हंगेरी व स्लोव्हाकिया या दोन्ही युरोपिय देशांनी त्यासाठी तयारी दर्शविली आहे. काही दिवसांपूर्वीच महासंघातील पोलंड या देशाने रशियाविरोधातील निर्बंध कुचकामी ठरल्याचा दावा करताना रुबलच्या मजबुतीचा हवाला दिला होता. त्यामुळे नजिकच्या काळात रशियाच्या रुबलला अधिकच बळ मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

leave a reply