रशियाचे संरक्षणमंत्री शोईगू यांची युक्रेनमधील ‘रशियन कमांड’ला भेट

Russian Commandमॉस्को – खेर्सन व डोनेत्स्क प्रांतात सुरू असणाऱ्या प्रखर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी युक्रेनमधील रशियाच्या ‘जॉईंट कमांड सेंटर’ला भेट दिली. या भेटीत रशियाच्या युक्रेनमधील मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या जनरल सर्जेई सुरोविकिन यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर दीर्घकालिन बैठक घेतल्याचे समोर आले आहे. या बैठकीचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले असून युक्रेनमधील मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यात येत असल्याचे दाखविण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनमधील रशिया नियंत्रित भागाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ ठरते.

गेल्या काही दिवसात डोनेत्स्क प्रांत व खेर्सन भागात रशिया आणि युक्रेनच्या लष्करात तीव्र लढाई सुरू आहे. रशिया व युक्रेनमधील शांतीचर्चेचा मुद्दाही ऐरणीवर येत असून त्यापूर्वी जास्तीत जास्त भाग ताब्यात असावा यासाठी दोन्ही बाजूंचे प्रयत्न सुरू आहेत. डोनेत्स्कमधील बाखमत व सोलेदार या भागांवर ताबा मिळविण्यासाठी रशियन फौजा आगेकूच करीत आहेत. तर खेर्सनमधील युक्रेनचे प्रतिहल्ले रोखण्यासाठी रशियाने नव्या तैनातीसह भक्कम आघाडी उभारल्याचे सांगण्यात येते. पुढील काही दिवसांमध्ये या क्षेत्रात निर्णायक संघर्ष होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनमधील लष्करी कमांडला दिलेली भेट व घेतलेली बैठक महत्त्वपूर्ण ठरते.

leave a reply