पाश्‍चिमात्यांच्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर रशियन अर्थव्यवस्थेची घसरण सुरू

मॉस्को – पाश्‍चिमात्य देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर रशियन अर्थव्यवस्थेत सुरू झालेली घसरण कायम असल्याचे समोर येत आहे. एका अमेरिकी डॉलरसाठी 117 रुबल मोजणे भाग पडत असून रशियन कर्जरोख्यांचे व्यवहार पूर्णपणे बंद पडल्याचे सांगण्यात येते. रशियातील प्रमुख शेअरबाजार असणारे मॉस्को स्टॉक एक्सेंज सलग चौथ्या दिवशी बंद ठेवण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियन अर्थव्यवस्थेवर 1990 किंवा 1918 सालाप्रमाणे गंभीर संकट ओढवू शकते, असा इशारा मॅक्सिमिलन हेस या विश्‍लेषकांनी दिला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 10 दिवस पूर्ण होत असून पाश्‍चात्य देशांकडून रोज नवनव्या निर्बंधांची घोषणा होत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेसह युरोपिय मित्रदेशांनी ‘स्विफ्ट` या आंतरराष्ट्रीय यंत्रणेतून निवडक रशियन बँकांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिका, युरोपिय महासंघ व ब्रिटनने रशियाच्या मध्यवर्ती बँकेकडून निधी उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर बंदी घातल्याचे जाहीर केले होते. रशियन उद्योजकांच्या परदेशातील मालमत्ता जप्त करण्याची तसेच गोठविण्याची कारवाई सुरू झाली आहे. रशियाच्या अंतराळ, तंत्रज्ञान तसेच हवाईक्षेत्रावरही मोठे निर्बंध लादण्यात आले आहेत.

या सगळ्याचे मोठे परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. पाश्‍चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांनंतर रशियाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र रशियन जनतेतील भीतीचे वातावरण कायम असून बँका व एटीएममधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यात येत आहेत. हजारो रशियन नागरिकांनी परकीय चलन खरेदी करण्यास सुरुवात केल्याने रुबलच्या मूल्यात प्रचंड घसरण झाली आहे. रशियासह इतर देशांमध्ये अमेरिकी डॉलर तसेच युरो खरेदी करण्यासाठी 115 ते 125 रुबल मोजणे भाग पडत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व गुंतवणुकदारांनी रशियन कर्जरोख्यांची खरेदी बंद केल्याचे वृत्तही समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, रशियन अर्थव्यवस्थेला गेल्या शतकातील 1918 किंवा 1990 साली आलेल्या आर्थिक संकटाप्रमाणे भयानक आपत्तीला तोंड द्यावे लागेल, असा इशारा लंडनस्थित मॅक्सिमिलन हेस यांनी दिला आहे. नव्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी रशियाकडे पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्याचा दावाही हेस यांनी केला.

leave a reply