रशियन इंधन कंपनी गाझप्रोम तीन दिवसांसाठी इंधनपुरवठा बंद ठेवणार

Russian-fuel-companyमॉस्को/किव्ह – युरोपिय देशांना इंधनपुरवठा करणाऱ्या ‘गाझप्रोम’ या रशियन कंपनीने पुढील आठवड्यात तीन दिवसांसाठी इंधनपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली. नियमित देखभालीसाठी 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत ‘नॉर्ड स्ट्रीम 1’ या इंधनवाहिनीचा पुरवठा बंद ठेवण्यात येईल, असे ‘गाझप्रोम’ने स्पष्ट केले. यापूर्वीही गाझप्रोमने दोनदा युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनपुरवठा बंद केला होता.

Russian-fuel-company-Mapयुरोपिय देशांना करण्यात येणाऱ्या इंधनपुरवठ्यापैकी 30 टक्क्यांहून अधिक इंधनपुरवठा रशियाकडून करण्यात येतो. यात यामल, नॉर्ड स्ट्रीम व तुर्क स्ट्रीम यासारख्या इंधनवाहिन्यांचा समावेश आहे. नॉर्ड स्ट्रीम ही प्रमुख इंधनवाहिनी असून याद्वारे जर्मनी व पुढे इतर युरोपिय देशांना इंधनवायू पुरविण्यात येतो.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपिय देशांनी रशियावर मोठे निर्बंध लादले असून त्यात इंधनक्षेत्रावरील निर्बंधांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने युरोपिय देशांचा इंधनपुरवठा घटविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यात युरोपिय देशांचा इंधनपुरवठा जवळपास 60 टक्क्यांनी घटविला आहे. त्यामुळे युरोपिय देशांमध्ये आधीच अस्वस्थता असून नव्या घोषणेने त्यात अधिकच भर पडली आहे. युरोपातील बहुतांश देशांनी यापूर्वीच ‘एनर्जी इमर्जन्सी’ची घोषणा करून इंधनाच्या वापरावर मर्यादा घातल्या आहेत.

दरम्यान, वीजेच्या टंचाईमुळे हिवाळ्यात स्वित्झर्लंडमध्ये दंगली व लुटालुटीच्या घटना घडू शकतात, असा इशारा स्विस पोलीसांनी दिला. थंडी, अंधार व वीजेवर चालणाऱ्या सर्व यंत्रणा ठप्प झालेल्या; अशा परिस्थितीत नागरिक रस्त्यावर उतरून हिंसक पद्धतीने आपला संताप व्यक्त करु शकतात, असे स्वित्झर्लंडमधील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी फ्रेडी फॅस्लर यांनी बजावले.

leave a reply