रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून 36 तासांच्या संघर्षबंदीची घोषणा

युक्रेन व अमेरिकेकडून साशंकता व्यक्त

36-hour ceasefireमॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धात 36 तासांच्या एकतर्फी संघर्षबंदीची घोषणा केली आहे. रशिया व पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणाऱ्या ‘ऑर्थोडॉक्स ख्रिस्तीधर्मियां’कडून 7 जानेवारीला ‘ख्रिसमस’चा सण साजरा करण्यात येतो. ही पार्श्वभूमी पुढे करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी संघर्षबंदी घोषित केली आहे. मात्र पुतिन यांच्या या घोषणेवर युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी साशंकता व्यक्त केली असून हा रशियाच्या डावपेचांचा भाग असल्याची टीका केली आहे. रशिया-युक्रेन युद्धाला दहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून या कालावधीत अनेक देशांनी संघर्षबंदीसाठी प्रयत्न केले होते.

President Vladimir Putin भारतासह फ्रान्स तसेच तुर्कीने यासाठी पुढाकार घेतल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. गुरुवारी तुर्की व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवरून बोलणी झाल्याची माहितीही समोर आली होती. यात, रशियाविरोधातील संघर्षात भूभाग गमावला आहे, हे वास्तव युक्रेनने मान्य केल्यास आपण शांतीचर्चेसाठी तयार आहोत असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले होते.

त्याचवेळी रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रिआच किरिल यांनी ऑर्थोडॉक्स चर्चकडून साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमस सणाच्या निमित्ताने संघर्षबंदीचे आवाहनही केले होते. या आवाहनाची दखल घेत रशियन राष्ट्राध्यक्षांनी संघर्षबंदीची घोषणा केल्याचे सांगण्यात येते. रशियन प्रमाणवेळेनुसार शुक्रवार 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत संघर्षबंदी लागू होईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. रशियाने अशा रितीने संघर्षबंदीची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

fighting-vehicle-fileमात्र रशियाच्या या संघर्षबंदीवर युक्रेन व अमेरिकेकडून टीका करण्यात येत आहे. ही घोषणा म्हणजे युक्रेनी फौजा आगेकूच करीत असताना त्यांना रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. या संघर्षबंदीचा फायदा घेऊन रशिया पूर्व युक्रेनमधील विविध आघाड्यांवरील आपली तैनाती अधिकच वाढवेल, असा आरोपही झेलेन्स्की यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही रशियाच्या संघर्षबंदीच्या घोषणेवर साशंकता व्यक्त केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन थोडा ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वक्तव्य बायडेन यांनी केले.

दरम्यान, गुरुवारी अमेरिका व जर्मनीने युक्रेनला नव्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा केली. अमेरिका युक्रेनला ‘ब्रॅडले’ हे हलक्या वजनाचे रणगाडे पुरविणार आहे. तर जर्मनी युक्र्रेनला पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे देणार असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात याची माहिती देण्यात आली.

leave a reply