रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी घातल्यास भयावह परिणाम होतील

-रशियाच्या उपपंतप्रधानांचा इशारा

मॉस्को – ‘रशियाचे इंधन नाकारल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर भयावह परिणाम होऊ शकतात. इंधनाच्या दरांमध्ये अनपेक्षित भडका उडू शकतो. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे ३०० डॉलर्सपर्यंत भडकू शकतात’, असा खरमरीत इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी दिला आहे. रशिया युरोपमध्ये जाणारी इंधनवाहिनी बंद करु शकतो, असे संकेतही रशियन सूत्रांकडून देण्यात आले आहेत.

Alexander-Novakअमेरिका व युरोपिय देशांमध्ये गेले काही दिवस रशियन इंधनावर बंदी घालण्याबाबत चर्चा सुरू होती. रशियन इंधनावर बंदी टाकल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसेल व रशियाला युद्ध थांबविणे भाग पडेल, असे दावे करण्यात येत होते. मात्र युरोपिय देश यासाठी तयार नसल्याचे समोर आले होते.

युरोपला लागणार्‍या इंधनापैकी एक तृतियांश इंधनपुरवठा रशियाकडून करण्यात येतो. सध्या युरोपात इंधनवायुची टंचाई भासत आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनवायुचे दर कडाडले असून प्रति हजार घनमिटर इतक्या इंधनवायूचे दर सध्या दोन हजार डॉलर्सवर गेले आहेत. आधीच्या काळात हे दर हजार डॉलर्सच्या आसपास होते. दुपटीने झालेली दरवाढ युरोपिय देशांवरील ताण वाढविणारी ठरते. अशा परिस्थितीत रशियातून निर्यात केल्या जाणार्‍या इंधनवायूवर निर्बंध लादण्याचे धाडस युरोपिय देश करू शकत नाहीत.

Russian-fuel-importsइंधनासाठी युरोपिय देशांचे रशियावरील अवलंबित्त्व अमेरिका दूर करू शकत नाही. अमेरिका आणि युरोपिय देशांनी यासाठी आत्ताच तातडीने प्रयत्न करण्याचे ठरविले, तरी ते शक्य नाही. कारण सध्या रशियाकडून इंधनवायू मिळाला नाही, तर युरोपिय देशांची अवस्था बिकट बनेल. रशिया सोडून दुसर्‍या देशाकडून इंधनाची आयात करणे युरोपिय देशांना शक्य नाही.

रशियाच्या पाईपलाईने द्वारे पुरविल्या जाणार्‍या इंधनवायुच्या तुलनेत जहाजाने पुरविल्या जाणार्‍या इंधनाच्या साठ्यासाठी व पुरवठ्यासाठी युरोपला ७० अब्ज युरो इतका खर्च करावा लागेल. युरोपकडे ही क्षमता नाही, ही बाब विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर रशियन उपपंतप्रधानांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply