पाश्चिमात्यांनी टाकलेल्या निर्बंधांनंतरही रशियाची इंधन निर्यात तीन वर्षातील सर्वोच्च पातळीवर

मार्च महिन्यात प्रतिदिनी ८१ लाख बॅरल्सची निर्यात केली

Russia's fuel exportsमॉस्को/पॅरिस – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्यांनी टाकलेल्या निर्बंधांनंतरही रशियाने इंधनक्षेत्रातील व्यवहार सुरळीत ठेवण्यात यश मिळविल्याचे उघड झाले आहे. मार्च महिन्यात रशियातून होणारी कच्च्या तेलाची निर्यात प्रतिदिन ८१ लाख बॅरल्सवर पोहोचल्याचे ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या नव्या अहवालात सांगण्यात आले. ही गेल्या तीन वर्षातील सर्वोच्च पातळी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी मार्च महिन्यात रशियाने इंधन निर्यातीतून १२.७ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळविला असून फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत त्यात तब्बल एक अब्ज डॉलर्सची भर पडल्याचे ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ जाहीर केले.

IEAशुक्रवारी पॅरिस स्थित ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने ‘ऑईल मार्केट रिपोर्ट-एप्रिल२०२३’ प्रसिद्ध केला. त्यात २०२३ साली कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन २० लाख बॅरल्सने वाढण्याचे भाकित करण्यात आले आहे. त्याचवेळी ओपेक व ओपेक प्लस गटाने केलेल्या कपातीमुळे इंधनाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल्सने घटेल, असा अंदाजही व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तात्पुरते चढउतारा कायम राहतील मात्र मोठे बदल होणार नसल्याचे संकेतही ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने अहवालात दिले आहेत.

वार्षिक अंदाज वर्तवितानाच इंधनक्षेत्रातील आघाडीचा देश असणाऱ्या रशियाच्या इंधनक्षेत्राबाबत स्वतंत्र उल्लेख करण्यात आला. निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात रशियाने आपली इंधन निर्यात तीन वर्षातील विक्रमी पातळीवर नेली आहे. मार्च महिन्यात रशियातून होणारी कच्च्या तेलाची निर्यात प्रतिदिन ८१ लाख बॅरल्सवर गेली. दररोज होणाऱ्या निर्यातीत सहा लाख बॅरल्सची भर पडली आहे. प्रतिदिन ८१ लाख बॅरल्स हा एप्रिल २०२०नंतरचा सर्वोच्च स्तर ठरतो.

fuel exportsकच्च्या तेलाबरोबरच पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. मार्च महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात प्रतिदिन साडेचार लाख बॅरल्सनी वाढली असून ३१ लाख बॅरल्सवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाची निर्यात वाढल्याने रशियाला त्यातून मिळणारे उत्पन्न १२.७ अब्ज डॉलर्सवर गेले आहे. ‘प्राईस कॅप’मुळे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत एक अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. ‘प्राईस कॅप’चे निर्बंध डळमळीत बनल्याचे संकेत मिळत असून एप्रिल महिन्यात झालेल्या व्यवहारांमध्ये दराची मर्यादा ओलांडली गेल्याचे ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने निदर्शनास आणून दिले आहे.

गेल्याच महिन्यात रशियाचे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांनी, रशियाने निर्बंध झुगारण्यात यश मिळविले असून इंधन निर्यात सुरळीत ठेवली आहे, अशी ग्वाही दिली होती. ‘पाश्चिमात्यांच्या निर्बंधांमुळे बाधित झालेले इंधन मित्रदेशांना निर्यात करण्यात आले आहे. रशियाच्या इंधनविक्रीत घसरण झालेली नाही’, असे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांनी सांगितले होते. चीन व भारत हे मित्रदेश रशियाकडून विक्रमी प्रमाणात इंधन खरेदी करीत असल्याचे अहवाल गेल्या काही दिवसात समोर आले आहेत. त्याचवेळी ‘प्राईस कॅप’ लादणाऱ्या जी७ देशांपैकी जपाननेही रशियाकडून इंधनाची आयात कायम ठेवल्याचे समोर आले आहे. हे सारे पाश्चिमात्यांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर लादलेले निर्बंध अपयशी ठरल्याचे संकेत देत आहेत. ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या अहवालाने पाश्चिमात्यांचे रशियावरील निर्बंध अपयशी ठरल्याच्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे.

leave a reply