युक्रेनच्या ताब्यातून सोलेदार शहर मुक्त केल्याचा रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’चा दावा

कारवाईत जवळपास 500 युक्रेनी जवान ठार केल्याची माहिती

Russia's Wagner Groupमॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील सोलेदार शहर युक्रेनच्या ताब्यातून मुक्त केल्याचा दावा रशियाच्या ‘वॅग्नर मिलिटरी ग्रुप’ या कंत्राटी लष्करी कंपनीचे प्रमुख येव्गेनी प्रिगोझिन यांनी केला. यावेळी वॅग्नर ग्रुपकडून सोलेदारमध्ये असलेल्या खाणींचे काही फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सोलेदारवर मिळविलेल्या नियंत्रणाला दुजोरा दिला असून रशियन जवानांनी दिलेले बलिदान तसेच त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली. मात्र युक्रेनने रशियाचे दावे फेटाळले असून सोलेदारमधील संघर्ष अद्यापही सुरू असल्याचा दावा केला आहे.

Russia Ukraine Warसोलेदार हे डोनेत्स्क प्रांतातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. या शहरात ‘रॉक सॉल्ट’(सैंधव) व जिप्समच्या मोठ्या खाणी असून यापूर्वी 2014 साली तसेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या संघर्षात रशियाने हे शहर ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर युक्रेनी लष्कराने रशियन तुकड्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. रशियासाठी या शहरावरील नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे शहर डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर्स अंतरावर आहे. त्यामुळे बाखमतवरील ताब्यासाठी सोलेदारवरील नियंत्रण निर्णायक ठरते.

गेल्या काही दिवसांपासून सोलेदारमधील संघर्षाबाबत सातत्याने उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या पार्श्वभूमीवर, ‘वॅग्नर ग्रुप’च्या प्रमुखांनी बुधवारी रात्री निवेदन प्रसिद्ध करून सोलेदार युक्रेनच्या ताब्यातून मुक्त केल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या संघर्षात जवळपास 500 युक्रेनी जवान ठार झाल्याचे ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येव्गेनी प्रिगोझिन यांनी म्हटले आहे. शहरात सर्व जागांमध्ये युक्रेनी जवानांच्या प्रेतांचा खच पडल्याचा दावाही त्यांनी केला.

map ukrin russiaवॅग्नरकडून करण्यात आलेल्या या दाव्यांना रशियाच्या संरक्षणन विभागाने दुजोरा दिलेला नाही. मात्र रशियन सरकारचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी सोलेदारवरील नियंत्रणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी रशियन जवानांच्या बलिदानाची व शौर्याची प्रशंसा केली. त्याचवेळी आता विजय साजरा करण्याची वेळ नसून खूप काम बाकी आहे, असा दावाही केला. डोनेत्स्क प्रांतातील रशिया समर्थक बंडखोरांच्या गटाकडूनही सोलेदारच्या ताब्याची पुष्टी करण्यात आली आहे. आता रशियाला बाखमतवर ताबा मिळविण्यासाठी अधिक आक्रमक हल्ले करता येतील व युक्रेनी फौजांना होणारा पुरवठा तोडता येईल, असा दावा डोनेत्स्कमधील अधिकाऱ्यांनी केला.

मात्र युक्रेनने रशियाचे दावे फेटाळले आहेत. सोलेदार अद्याप पूर्णपणे रशियाच्या ताब्यात गेलेले नसून, शहरात संघर्ष सुरू आहे, असे युक्रेनच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही सोलेदारवर रशियाने नियंत्रण मिळविले नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी सोलेदारनजिक युक्रेनच्या फौजांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात रशियाचे 100 जवान ठार झाल्याचाही दावा केला आहे.

हिंदी

leave a reply