इंधनव्यापारासाठी डॉलरव्यतिरिक्त इतर चलनांचा वापर करण्यास सौदी तयार

सौदीचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान

डॅव्होस – ‘सौदी अरेबियाने आपल्या व्यापारातील व्यवहारांसाठी कोणत्या चलनांचा वापर करायचा, यासंदर्भात चर्चा करण्यास काहीच हरकत नाही. त्यात अमेरिकी डॉलर, युरो, सौदी रियाल या सगळ्यांचा समावेश असू शकतो. जागतिक स्तरावर व्यापार वाढविण्यासाठी कोणत्याही मुद्यावर बोलणी करण्यास आम्ही तयार आहोत. सौदी कोणत्याही गोष्टीपासून दूर पळतो आहे, असे मला वाटत नाही’, या शब्दात सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान यांनी आपला देश इंधनव्यापारासाठी अमेरिकी डॉलरव्यतिरिक्त इतर चलनांचा वापर करु शकतो असे संकेत दिले.

SaudiJadaanयुरोपच्या ‘डॅव्होस’ शहरात सुरू असणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत सौदीच्या अर्थमंत्र्यांनी चीनबरोबर असलेल्या धोरणात्मक संबंधांचाही उल्लेख केला. ‘सौदी अरेबिया व चीनमध्ये उत्तम धोरणात्मक संबंध निर्माण झाले आहेत. सौदीबरोबर सहकार्यास तयार असलेल्या युरोपिय देशांसह इतर देशांबरोबरही आम्ही चांगले संबंध प्रस्थापित करण्याची तयारी दर्शविली आहे’, असे सौदीच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सौदीच्या मंत्र्यांनी अमेरिकी डॉलरव्यतिरिक्त इतर चलनांचा व्यापारासाठी वापर करण्याबाबत दिलेला संदेश लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या शतकात अमेरिकी डॉलरला आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे राखीव चलन म्हणून मान्यता मिळवून देण्यात सौदीसह आखाती देशांनी सुरू केलेल्या इंधनव्यवहारांचा प्रमुख वाटा होता. इंधन उत्पादक देशांनी डॉलरमध्ये व्यवहार मान्य केल्याने त्याचा वापर वाढून सर्वमान्य चलन म्हणून प्रस्थापित झाला होता. मात्र गेल्या वर्षभरात अमेरिका व आखातातील प्रमुख अरब देशांमधील संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेचे बायडेन प्रशासन आखाती देशांच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

त्यामुळे आखाती देशांनी चीन, रशिया, भारत यासारख्या देशांबरोबरील सहकार्यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आखाती देशांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पुढील काळात अरब देशांबरोबरील इंधनव्यवहार युआन चलनात करण्याचे संकेत दिले. ‘चीन यापुढेही आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवेल. नैसर्गिक इंधनवायूचा व्यापारही वाढविण्यात येईल. या इंधनव्यवहारांसाठी चीनकडून शांघाय पेट्रोलियम ॲण्ड नॅशनल गॅस एक्सेंजचा व्यासपीठ म्हणून वापर होईल. या माध्यमातून होणारे कच्चे तेल व इंधनवायूचे व्यवहार युआनमध्ये पार पडतील’, असे जिनपिंग यांनी म्हटले होते.

चीन हा जगातील आघाडीचा इंधन आयातदार देश असून सर्वाधिक इंधन आखाती देशांकडून आयात करण्यात येते. त्यामुळे चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला प्रस्ताव महत्त्वाचा ठरतो. चीनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सौदी अरेबियासारख्या आघाडीच्या देशाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे अर्थमंत्री जदान यांच्या वक्तव्यातून दिसून येते.

leave a reply