महाराष्ट्रात १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार

शाळा सुरूमुंबई – कोरोनामुळे गेल्या दीडवर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीसह सर्व वर्ग खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नियमावली लवकरच शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाईल. मात्र मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा निर्णय पालकांसाठी ऐच्छिक ठेवण्यात येणार असल्याची बातमी आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या साथीचे संक्रमण वाढू लागल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर संक्रमण दर कमी असलेल्या भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच वर्ग खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरी भागात आठ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र पहिली ते सातवीच्या मुलांचे ऑनलाईनच शिक्षण सुरू आहे. तिसरी लाट आली तर मुले संक्रमीत होण्याचा धोका जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे हे वर्ग बंद ठेवण्यात आले होते. मात्र हे वर्गही आता खुले करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

कृतीदलाकडून आलेल्या शिफारसी, तज्ज्ञाचे मत या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी शाळा व्यवस्थापनांशी आणि पालकांची मते घेण्यात आल्याचा दावा गायकवाड यांनी केला. शाळा सुरू करण्यासाठी आलेल्या शिफारसी आणि चर्चेतून समोर आलेल्या प्रस्तावानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केल्याचे गायकवाड म्हणाल्या.

मुलं प्रत्यक्ष शाळेत जात नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. मुलांना एकत्र शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम आवश्यक राहणार आहेत. हे नियम ठरवून एसओपी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.

leave a reply