इराणच्या ‘अंडरग्राउंड मिसाईल सिटीज्’ची अमेरिकेकडून गंभीर दखल

वॉशिंग्टन – पर्शियन आखातातील आपल्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी इराणने ‘अंडरग्राउंड मिसाईल सिटीज्’ (भुयारी क्षेपणास्त्रांची शहरे) विकसित केल्याचा इशारा इराणने काही दिवसांपूर्वी दिला होता. इराणच्या या इशाऱ्यावर अमेरिका आणि सौदी अरेबियाने सडकून टीका केली आहे. आखातातील शांती आणि सुरक्षेसाठी इराण धोकादायक बनल्याचे या धमकीतून उघड होत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचा हा आरोप म्हणजे इराणवरील पुढच्या कारवाईची तयारी असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Iran-America-Missileइराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नौदलाचे कमांडर रियर ॲडमिरल अलीरेझा तान्गसिरी यांनी इराणी मासिकाशी बोलताना भुयारी क्षेपणास्त्रांच्या शहरांविषयीची माहिती दिली. पर्शियन आणि ओमानच्या आखाताच्या तोंडाजवळ ही भुयारी शहरे असल्याचे तान्गसिरी यांनी सांगितले. या भुयारी शहरांमध्ये प्रगत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश असून ही क्षेपणास्त्र इराणच्या शत्रूसाठी भयंकर स्वप्नासारखी ठरतील, असा दावा त्यांनी केला. याआधी इराणने आपल्या भुयारी क्षेपणास्त्रांच्या शहरांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. एका डोंगराच्या गुहांमध्ये क्षेपणास्त्रे साठविल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते. मात्र पहिल्यांदाच इराणने किनारपट्टीजवळ क्षेपणास्त्रांची शहरे उभारल्याचे जाहीर केले आहे.

इराणी कमांडरांनी दिलेला हा इशारा अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. ‘इराणला आपल्या आखातातील शेजारी देशांबरोबर चांगले संबंध अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. पण, इराणच्या कारवाया याच आखाती देशांना धमकावीत आहेत व या क्षेत्रातील शांती व सुरक्षेला आव्हान देत आहेत. इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि त्यांचे नेते, आखातातील अस्थैर्याचे मूळ कारण आहे, हे त्यांच्या विधानातून स्पष्ट होऊ लागले आहे’, असा आक्षेप पेंटगॉनने नोंदविला. सौदी अरेबियाने देखील अमेरिकेचे हे आरोप उचलून धरले आहेत. पर्शियन आखातातील इराणच्या कारवाया या सागरी क्षेत्रातील वाहतुकीच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे, सौदीने म्हटले आहे. यासाठी सौदीने काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा दाखला दिला. पर्शियन आखातात अमेरिका आणि मित्रदेशांच्या युद्धनौकांना धमकावणाऱ्या इराणच्या गस्तीनौकांनी काही दिवसांपूर्वी सौदीच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली होती, याची आठवण सौदीने करुन दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या स्फोटांच्या मालिकेसाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलच्या कारवाया धोकादायक असून इस्रायल जगभरात कुठेही असे हल्ले चढवू शकतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन इस्रायलला वेळीच रोखावे, असे आवाहन इराण सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी केले आहे. आपल्या देशातील नेमका कुठल्या स्फोटासाठी इस्रायल जबाबदार आहे, हे मात्र इराणने स्पष्ट केलेले नाही. पण नातांझ अणुप्रकल्पामध्ये लागलेल्या संशयास्पद आगीमुळे इराणचा अणुकार्यक्रम किमान एक ते दोन वर्षांसाठी पिछाडीवर गेल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे. मंगळवारी इराणच्या आणखी एका केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट झाला असून यात दोघांचा बळी गेला आहे.

leave a reply