काबुलमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये सात जणांचा बळी

- ‘आयएस`चा हात असल्याचा संशय

सात जणांचा बळीकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये घडविण्यात आलेल्या स्फोटांमध्ये सात जणांचा बळी गेला आहे. पश्‍चिम काबुलमधील ‘दस्त-ए-बर्चि` भागातील शाळा तसेच ट्युशन सेंटरला लक्ष्य करण्यात आले. या भागात शियापंथियांचे वास्तव्य असून स्फोटांद्वारे या समुदायात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी यामागे ‘आयएस`चा हात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी मे महिन्यात याच भागातील मुलींच्या शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला चढविण्यात आला होता.

सात जणांचा बळीपश्‍चिम काबुलमधील ‘अब्दुल रहिम शहिद हायस्कूल`बाहेर दोन स्फोट घडविण्यात आले. तिसरा स्फोट शाळेपासून काही अंतरावर असलेल्या एका ट्यूशन सेंटरमध्ये घडविण्यात आला. शाळेत झालेल्या स्फोटांसाठी ‘आयईडी` स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. तर ट्यूशन सेंटरवर ग्रेनेड फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्फोटांमध्ये सात जणांचा बळी गेला असून 15हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी मुलांचा समावेश आहे.

‘दस्त-ए-बर्चि` भागात हजारा शियापंथियांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अफगाणिस्तानातील ‘आयएस`ने गेली काही वर्षे सातत्याने देशातील शियापंथियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शियापंथियांच्या शिक्षणसंस्था, सांस्कृतिक केंद्रे, मैदाने यांच्यावर हल्ले चढविण्यात आले आहेत. यात शेकडो जणांचा बळी गेला असून हजारापंथियांनी या हल्ल्यांविरोधात निदर्शनेही केली आहेत.

गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही काळासाठी हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ‘आयएस`ने आपल्या हल्ल्यांमध्ये वाढ केल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानचे सरकार बाहुले असल्याचा तसेच इस्लामविरोधी असल्याचे आरोप ‘आयएस`कडून करण्यात आले आहेत. ‘आयएस` अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही उघड झाले आहे.

leave a reply