इराणमध्ये अझरबैजानच्या दूतावासात गोळीबार

सुरक्षा प्रमुखाचा बळी

तेहरान/बाकू – इराणची राजधानी तेहरानमधील अझरबैजानच्या दूतावासात घुसून हल्लेखोराने गोळीबार केला. यामध्ये सुरक्षा प्रमुखाचा बळी गेला तर दोन सुरक्षा जवान जखमी झाले. इराण आणि अझरबैजानमधील संबंधात याआधीच तेढ निर्माण झाली आहे. सदर घटनेमुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव वाढू शकतो, असा दावा केला जातो.

iran azerbaijani embassyशुक्रवारी सकाळी तेहरानमधील अझबैझानच्या दूतावासाचे सुरक्षाकडे ओलांडून हल्लेखोराने प्रवेश केला. दूतावासात प्रवेश केल्यानंतर हल्लेखोराने कॅलाशनिकोव्ह रायफल काढून गोळीबार केला. यामध्ये दूतावासातील सुरक्षा प्रमुख जागीच ठार झाला. तर दूतावासाच्या सुरक्षेसाठी मुख्यद्वारावर तैनात जवान गोळीबारात जखमी झाले. इराणने या हल्ल्याची तीव्र शब्दात निर्भत्सना केली आहे. तसेच हल्लेखोराला अटक करून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती इराणच्या पोलीस प्रमुखांनी दिली.

सदर हल्ला म्हणजे इराण आणि अझरबैजानच्या संबंधातील तणाव वाढविणारा ठरतो. तुर्की भाषिक अझरबैजान आणि इराणमध्ये मोठे मतभेद आहेत. मध्य आशियातील अझरबैजानला तुर्की तसेच इस्रायलचा लष्करी पाठिंबा आहे. तर अझरबैजानचा शत्रू असलेल्या आर्मेनियाबरोबर इराणचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इराण व अझरबैजानच्या सीमेवर या तणावाचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. दरम्यान, इराणमधील लाखो अझेरी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण करून इराणमध्ये गृहयुद्ध पेटविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपकाही इराणने अझरबैजानवर याआधी ठेवला होता.

leave a reply