तैवानच्या स्वातंत्र्याच्या मुद्यावरुन चीन-अमेरिकेत लष्करी संघर्ष पेटेल

- अमेरिकेतील चीनच्या राजदूताचा इशारा

लष्करी संघर्ष पेटेलवॉशिंग्टन – ‘तैवान हा चीन आणि अमेरिकेतील सर्वाधिक स्फोटक मुद्दा ठरतो. येत्या काळात अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे शेफारलेल्या तैवानने स्वातंत्र्याच्या मार्गाने प्रवास सुरू केला तर, चीन आणि अमेरिकेमध्ये लष्करी संघर्ष पेटेल’, असा इशारा अमेरिकेतील चीनचे राजदूत किन गँग यांनी दिला. काही तासांपूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष विल्यम लै यांची भेट घेतली. तर त्याआधी अमेरिकेच्या संसदेत तैवानची संरक्षणसिद्धता वाढविण्यासाठी ‘आर्म तैवान ऍक्ट’ सादर करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर चीनने अमेरिकेला हा इशारा दिल्याचा दावा केला जातो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते व नंतर अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त झालेल्या किन गँग यांनी अमेरिकेच्या प्रसिद्ध रेडिओवाहिनीशी बोलताना लष्करी संघर्षाचा इशारा दिला. अमेरिका तैवानच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गँग यांनी केला. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे बळ मिळालेले तैवानचे नेते स्वातंत्र्याच्या मागणीवर अडून राहिले आणि यापुढे त्यांनी तशा हालचाली सुरू केल्या तर यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले जाईल. यातून संघर्ष पेट घेईल, असे चीनच्या राजदूतांनी धमकावले.

यावर प्रतिक्रिया देताना, अमेरिका आपल्या ‘वन चायना पॉलिसी’शी वचनबद्ध असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले. त्याचबरोबर तैवानबरोबरच्या सहकार्य कराराविषयीही बांधिल असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. ‘अमेरिका तैवानला स्वसंरक्षण क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करीत राहील. तसेच तैवानी जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या कोणत्याही शक्तीचा प्रतिकार करण्याची क्षमता अमेरिका राखून आहे’, असे पेंटॅगॉनच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. तैवानमधील स्वातंत्रतावादी गटांनी चीनला चिथावणी देणे सुरू ठेवले आणि मर्यादा ओलांडली तर तैवानवर निर्णायक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे चीनने बजावले होते. त्याचबरोबर चीनशी सहकार्य करणार्‍या देशांनी ‘वन चायना पॉलिसी’चा आदर करून तैवानबरोबर कुठल्याही प्रकारचे राजकीय व लष्करी सहकार्य ठेवू नये, अशी चीनची स्पष्ट भूमिका आहे. पण चीनच्या या अरेरावीला न जुमानता अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तैवानबरोबर लष्करी सहकार्य कायम ठेवले आहे.

यावर खवळलेल्या चीनने याआधीही अमेरिकेला लष्करी कारवाईचा इशारा दिला होता. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेसाठी आपले जवान रवाना केले तर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातील, अशी धमकी दिली होती. तर अमेरिकेने तैवानच्या जवळच्या सागरी क्षेत्रात विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांसह मोठा युद्धसराव करून चीनला चिथावणी दिली होती.

तर चीनमधील शी जिनपिंग यांची कम्युनिस्ट राजवट लष्करी बळावर तैवानच्या विलनीकरणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप अमेरिकेचे लोकप्रतिनिधी करीत आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकन सिनेटमध्ये सादर केलेल्या विधेयकात तैवानला दरवर्षी तीन अब्ज डॉलर्स संरक्षणसहाय्य पुरविण्याची तरतूद केली आहे.

दरम्यान, चीनने तैवानवर केलेल्या आक्रमणातून लगेच निकाल लागण्याची शक्यता नसून उलट हे युद्ध प्रदीर्घ काळापर्यंत चालण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकी अभ्यागटाच्या विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिका व सहकारी देश त्यात उतरतील, पण त्यात कोणीही निर्णायक विजय मिळवू शकणार नाही, असा दावा ‘ब्रुकिंग्ज् इन्स्टिट्यूट’मधील अभ्यासकांनी केला होता.

leave a reply