देशात ‘ईस्ट पाकिस्तान’सारखी परिस्थिती उद्भवली आहे

- इम्रान खान यांची पाकिस्तानी लष्कराला धमकी

लाहोर – इम्रान खान यांच्या लाहोरमधील घरातील ‘दहशतवाद्यांवर’ कारवाई करण्याचे इशारे पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी दिले आहेत. त्याचवेळी इम्रान खान यांना पुन्हा एकदा अटक करण्याची तयारी पाकिस्तानी लष्कर व सरकारने केल्याचे दिसत आहे. खान यांचे घर पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी घेरलेले असताना, संतापलेल्या इम्रान खान लष्कराला पुन्हा एकदा धमकावले. इथे ‘ईस्ट पाकिस्तान’सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगून इम्रान खान यांनी आपल्याला अटक झाल्यास पाकिस्तानचे तुकडे पडतील, असे संकेत दिले. सकाळच्या सुमारास हे दावे केल्यानंतर, संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी यावर सारवासारव केली.

देशात ‘ईस्ट पाकिस्तान’सारखी परिस्थिती उद्भवली आहे - इम्रान खान यांची पाकिस्तानी लष्कराला धमकीपाकिस्तानी लष्कराची ठिकाणे, लष्करी अधिकारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरही इम्रान खान यांच्या समर्थकांनी हल्ले चढविले होते. ९ मेपासून सुरू झालेल्या हिंसाचाराला इम्रान खान यांची चिथावणीच जबाबदार होती, असा आरोप पाकिस्तानचे सरकार व लष्कर करीत आहे. त्यांच्या समर्थकांनी गोळीबार केला होता, याकडे लक्ष वेधून हे सारे दहशतवादीच ठरतात, असे पाकिस्तानचे लष्कर सांगत आहे. या दहशतवाद्यांपैकी काहीजण इम्रान खान यांच्या लाहोरमधील घरामध्ये दडून बसले आहेत. त्यांना मोकळे सोडता येणार नाही, त्यांनी स्वतःहून घराबाहेर पडावे, अन्यथा पुढच्या २४ तासात त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा देत आहेत.

याच्या आधी पोलीस, निमलष्करी दल व लष्कराच्या जवानांनी देखील इम्रान खान यांच्या घराला घेरल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आपल्याला ठार करण्याचा कट शिजल्याचा आरोप करून इम्रान खान यांनी पुन्हा एकदा आपल्या समर्थकांना चिथावणी दिली. आपल्या पक्षाच्या सात हजाराहून अधिक कार्यकर्त्यांना विनाकारण ताब्यात घेण्यात आले आहे, अशी तक्रार देखील इम्रान खान यांनी केली. त्याचवेळी देशात सध्या ईस्ट पाकिस्तान अर्थात पूर्व पाकिस्तानसारखी स्थिती असल्याचा दावा इम्रान खान यांनी पुन्हा एकदा केला.

१९७१ साली त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातील बंगाली भाषिक जनतेवर पाकिस्तानच्या लष्कराने अनन्वित अत्याचार केले होते. यामुळे पूर्व पाकिस्तान फटून बांगलादेशची निर्मिती झाली होती. हे सारे पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारामुळे घडले, याची आठवण इम्रान खान करून देत आहेत. आत्ताच्या काळातही ईस्ट पाकिस्तानसारखीच परिस्थिती देशात असल्याचे सांगून लष्कराच्या अत्याचारामुळे पाकिस्तानचे विघटन होईल, अशी धमकी इम्रान खान देत आहेत. याआधीही त्यांनी असे इशारे दिले होते. गुरुवारी देखील इम्रान खान यांनी लष्कराच्या विरोधात हा इशारा दिला. मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर इम्रान खान यांनी पत्रकार परिषदेत आपल्या विधानांवर सारवासारव केली.

आपण लष्कराच्या विरोधात नाही, असे यावेळी इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात माझा संघर्ष झाला तर यात देशच पराभूत होईल, असा दावा इम्रान खान यांनी केला. मात्र देशात निवडणूक होऊ नये, यासाठी आपल्या विरोधात ही कारवाई केली जात असल्याच्या आरोपावर इम्रान खान ठाम आहेत. तर पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. याची जाणीव झाल्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षात चलबिचल सुरू झाल्याचे दिसते. गुरुवारी इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षात पाच जण बाहेर पडल्याचे वृत्त आहे.

हिंदी

 

leave a reply