न्यूझीलंडमध्ये ‘आयएस’समर्थक दहशतवाद्याच्या हल्ल्यात सहा जखमी

- पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार

‘आयएस’समर्थकऑकलंड – न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये ‘आयएस’समर्थक दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात सहाजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्लेखोर मूळचा श्रीलंकन असून 2011 साली तो न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर हल्लेखोराने एकदा सिरियाला जाण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. सदर हल्लेखोर 2016 सालापासून ‘वॉचलिस्ट’वर असतानाही हल्ला झाल्याने न्यूझीलंडची सुरक्षा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

शुक्रवारी दुपारी ‘आयएस’ समर्थक दहशतवादी ऑकलंडमधील ‘काऊंटडाऊन’ सुपरमार्केटमध्ये घुसला. घुसल्यावर समोरच्या शेल्फमधील मोठा सुरा उचलून हल्लेखोराने समोर येईल त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सहाजण जखमी झाले असून त्यातील चारजणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोर वॉचलिस्टमध्ये असल्याने मागावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ सुपरमार्केटमध्ये प्रवेश करून कारवाई सुरू केली. या कारवाईत हल्लेखोर ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी सुपरमार्केटमध्ये झालेला हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र कायदेशीर कारणांमुळे हल्लेखोराचे नाव व इतर पार्श्‍वभूमी जाहीर केली जाणार नसल्याचे सांगितले. हल्लेखोर मूळ श्रीलंकेचा नागरिक असून 32 वर्षाचा आहे. त्याला सध्या ‘एस’ हे नाव देण्यात आले असून 2011 साली न्यूझीलंडमध्ये आल्याचे सांगण्यात येते. इंटरनेटवर ‘आयएस’चे समर्थन तसेच हल्ल्याचे व्हिडिओ पोस्ट केल्याने तो सुरक्षायंत्रणांच्या नजरेत आला होता.

‘आयएस’समर्थक2017 साली ‘एस’ने सिरियात जाऊन ‘आयएस’मध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्याला न्यूझीलंडमधील विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर घराची झडती घेतली असता शस्त्रास्त्रे व काही वादग्रस्त फोटोग्राफ्स सापडले होते. एक वर्षाच्या तुरुंगवासानंतर त्याला सोडण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी ‘आयएस’ समर्थक संशयिताला पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते.

दहशतवादाचे समर्थन करीत असल्याची वादग्रस्त पार्श्‍वभूमी असताना व सुरक्षायंत्रणांच्या ‘वॉचलिस्ट’वर असतानाही ‘आयएस’समर्थक दहशतवाद्याने हा हल्ला चढविणे आश्‍चर्याची बाब मानली जाते. या घटनेने न्यूझीलंडच्या सुरक्षायंत्रणेसह दहशतवादविरोधी कायद्यांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड भागातही एका संशयिताने सुऱ्याच्या सहाय्याने हल्ला केला होता. मात्र तो हल्ला दहशतवादी नसल्याचे न्यूझीलंड सरकार व यंत्रणांकडून सांगण्यात आले होते.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित होत असताना, जगभरातील दहशतवाद्यांना यामुळे उत्तेजन मिळेल, अशी चिंता व्यक्त केली जाते. यामुळे दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढेल आणि जगभरातील एकांडे दहशतवादी ठिकठिकाणी हल्ले चढवतील, अशी भीती काही नेत्यांनी व्यक्त केली होती. हा इशारा प्रत्यक्षात उतरू लागल्याचे न्यूझीलंडमधील या हल्ल्यामुळे समोर येत आहे.

leave a reply