चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत युरोपच्या स्लोवाकियाचे शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखल

तैपेई – चीनकडून देण्यात येणार्‍या इशार्‍यांकडे दुर्लक्ष करून युरोपमधील स्लोवाकियाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तैवानच्या दौर्‍यावर दाखल झाले आहे. रविवारी स्लोवाकियाचा अधिकृत ध्वज व नाव असलेल्या विमानातून ४०हून अधिक जणांचा समावेश असलेले शिष्टमंडळ राजधानी तैपेईमध्ये उतरल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. गेल्याच महिन्यात युरोपिय संसदेच्या शिष्टमंडळाने तैवानला भेट दिली होती. त्यानंतर पुन्हा युरोपियन नेते व अधिकार्‍यांनी तैवानला भेट देणे हा चीनला संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत युरोपच्या स्लोवाकियाचे शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखलस्लोवाकियाचे वाणिज्य उपमंत्री कॅरोल गॅलेक यांच्या नेतृत्त्वाखाली ४३ जणांचे शिष्टमंडळ रविवारी तैवानमध्ये दाखल झाले. हे शिष्टमंडळ स्लोवाकियाचे नाव व ध्वज असलेल्या विमानातून तैपेई विमानतळावर उतरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्लोवाकियन शिष्टमंडळाचा तैवान दौरा अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले असून ही बाब चीनला अस्वस्थ करणारी ठरु शकते. स्लोवाकियाच्या शिष्टमंडळात १८ उच्चस्तरीय अधिकार्‍यांबरोबरच संशोधक व उद्योजकांचाही समावेश आहे. हे शिष्टमंडळ शुक्रवार १० डिसेंबरपर्यंत तैवानच्या दौर्‍यावर असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

तैवानमध्ये ‘रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस’ उघडणार्‍या मोजक्या युरोपिय देशांपैकी एक म्हणून स्लोवाकिया ओळखण्यात येतो. २००३ साली हे राजनैतिक कार्यालय सुरू करण्यात आले होते. चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत युरोपच्या स्लोवाकियाचे शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखलत्यानंतर दोन्ही देशांमध्ये आर्थिक व व्यापारी सहकार्य वाढण्यास सुरुवात झाली होती. सध्या दोन देशांमध्ये सुमारे ३० कोटी डॉलर्स इतका व्यापार होत असून गेल्या वर्षभरात १८ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. तैवानने स्लोवाकियात जवळपास ६० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. कोरोनाच्या काळात स्लोवाकियाने तैवानला दीड लाखांहून अधिक लसीचे डोस भेटही दिले होते. ऑक्टोबर महिन्यात तैवानच्या शिष्टमंडळाने स्लोवाकियाचा दौरा केला होता.

स्लोवाकियन शिष्टमंडळाची भेट ही युरोपिय शिष्टमंडळाने तैवानचा दौरा करण्याची दुसरी वेळ ठरली आहे. गेल्याच महिन्यात युरोपियन संसदेच्या शिष्टमंडळाने तैवानला भेट दिली होती. या भेटी युरोपिय महासंघाने तैवानसंदर्भात स्वीकारलेल्या नव्या धोरणाचा भाग असल्याचे मानले जाते. सप्टेंबर महिन्यात युरोपियन संसदेने तैवानबरोबरील संबंध बळकट करण्याचा निर्णय घेतला होता. चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत युरोपच्या स्लोवाकियाचे शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखलत्यानंतर महासंघाचा भाग असलेल्या लिथुआनियात तैवानची ‘डिफॅक्टो एम्बसी’ ठरेल असे राजनैतिक कार्यालयही सुरू झाले होते. लिथुआनिया व स्लोवाकियाव्यतिरिक्त झेक रिपब्लिकनेही तैवानबरोबरील संबंध बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत.

युरोपिय देश व तैवानमधील वाढते सहकार्य चीनला चांगलेच खटकत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने कोणतीही पूर्वसूचना न देता लिथुआनियातील आयात बंद केली होती. युरोपातील इतर देशांनी लिथुआनियाचा मार्ग अवलंबू नये म्हणून चीनकडून दडपण टाकण्याचे तसेच धमकाविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यानंतरही स्लोवाकियाने उच्चस्तरिय शिष्टमंडळ पाठवून चीनचा दबाव झिडकारल्याचे दिसत आहे.

leave a reply