पाकिस्तानातूनच भारतात अंमली पदार्थ येत असल्याची तस्करांची कबुली

नवी दिल्ली – पाकिस्तानातून अवैध मार्गाने भारतात अंमली पदार्थ येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणी कारावास भोगणाऱ्या गुन्हेगारांनी ही कबुली दिली. ‘ईयूरिपोर्ट्स’ या युरोपच्या न्यूजपोर्टलने हे वृत्त प्रसिद्ध केले. काही आठवड्यांपूर्वीच ‘सीमा सुरक्षा दला’ने (बीएसएफ) भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता.

अंमली पदार्थ

नुकताच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ८७२ गुन्हेगारांच्या मुलाखती घेऊन ‘ईयूरिपोर्ट्स’ने एक सर्वे केला. यावेळी ८३ टक्के तस्करांनी पाकिस्तानमधूनच अवैध मार्गाने भारतात अंमली पदार्थ पाठविले जातात, याची कबुली दिली. तर पाच टक्क्यांहून अधिक जणांनी नेपाळ आणि चार टक्के तस्करांनी अफगाणिस्तानचे नाव घेतले. पण गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षादलांनी अंमली पदार्थ जप्त करुन दहशतवादी संघटना आणि तस्करांचे कंबरडे मोडले आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले.

पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केला जातो. गेल्यावर्षी जून महिन्यात कस्टम विभागाने अमृतसरमधून २७०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले होते. पाकिस्तानकडून भारतात पसरविल्या जाणाऱ्या दहशतवादाचा ‘नार्को टेररिझम’ हा महत्वाचा भाग आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतून पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करतो. त्याचा वापर पाकिस्तान भारताच्या विरोधात करीत असल्याचे अनेकवार समोर आले आहे. या अहवालाच्या माध्यमातून युरोपच्या न्यूज पोर्टलने पाकिस्तानच्या ‘नार्को टेररिझम’चा पर्दाफाश केला.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी पाकिस्तान जम्मू- काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतात ‘पीव्हीसी’ पाईपलाईनच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न उधळला गेला होता. यावेळी ६२ किलोचे हेरॉईन जप्त करण्यात आले. याआधी पंजाबमध्ये असे तंत्र वापरण्यात आले होते. पण त्या ठिकाणी प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर हे तंत्र तस्करांनी अजमावण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी जम्मूच्या भारत- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला टनेल आढळला होता. या टनेलच्या माध्यमातून अंंमली पदार्थ आणि शस्त्रात्रे भारतात पाठविली जात होती.

leave a reply