युक्रेन युद्धाबाबत पक्षपात करणार्‍या पाश्‍चात्य माध्यमांना सोशल मीडियाने धारेवर धरले

वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धात आंतरराष्ट्रीय माध्यमे तटस्थता सोडून पक्षपाती वार्तांकन करीत असल्याचा आरोप सोशल मीडियावरून होत आहे. युक्रेनबरोबरील युद्धात रशियन लष्कराची सरशी होत असली, तरी प्रचारयुद्धात युक्रेनने बाजी मारली. माध्यमांद्वारे जगाची सहानुभूती कमावण्यात युक्रेन यशस्वी ठरला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना खलनायक म्हणून जगासमोर दाखविण्याचा युक्रेन तसेच अमेरिका आणि मित्रदेशांचे प्रयत्न अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसते. या सार्‍याला माध्यमांचा पक्षपात कारणीभूत असल्याची टीका सोशल मीडियावर जोर पकडत आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला होता. याचे तीव्र पडसाद जगभरात उमटले. पाश्‍चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, आपल्यासह युक्रेनी जनता रस्त्यावर उतरून रशियाचा प्रतिकार करेल, अशी ग्वाहीदेखील दिली. झेलेन्स्की यांनी रशियन जनतेलाही पुतिन यांना असलेला विरोध दाखवून आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात येते. यासह युक्रेनमध्ये घडणार्‍या इतर घटनांना पाश्‍चात्य माध्यमांकडून व्यापक व सकारात्मक पातळीवर प्रसिद्धी दिली जात आहे.

अमेरिका तसेच युरोपमधील आघाडीची माध्यमे, रशियाकडून चांगल्या युरोपियन नागरिकांना मारले जात असल्याचा, सुसंस्कृत युरोपिय नागरिकांच्या शहरात भीषण हल्ले होत असल्याचा अशा स्वरुपाचे वार्तांकन करीत आहेत. काही पत्रकारांनी युक्रेनमध्ये झालेले युद्ध ही घटना संघर्ष फक्त गरीब, मागासलेल्या व दुर्गम भागात होत नाही, अशा प्रकारची टिप्पणी केली आहे. अनेक पाश्‍चात्य पत्रकारांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना हा अफगाणिस्तान, इराक अथवा सिरियातील संघर्ष नाही, अशा स्वरुपाचे उद्गार काढले आहेत.

युरोपिय वंशाच्या, मध्यमवर्गीय वाटणार्‍या युक्रेनियन नागरिकांना दुसर्‍या देशात निर्वासित म्हणून जावे लागत असल्याची खंतही काही माध्यमांनी व्यक्त केली आहे.

या सर्व वार्तांकनावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे. जगातील इतर भागात सुरू असणारे संघर्ष व त्या देशातील नागरिकांना होणार्‍या यातना आणि युक्रेनमधील जनतेला होणारा त्रास यात करण्यात येणारा भेदभाव पाश्‍चात्य माध्यमांचा पक्षपाती दृष्टिकोन दाखवून देतो, असा ठपका सोशल मीडियाच्या युजर्सनी ठेवला आहे. माध्यमे युरोपातील संघर्ष व बिगरयुरोपिय देशांमधील संघर्ष यांच्यात दुजाभाव दाखवित असल्याचे नाराजी सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

युक्रेनी जनतेने रशियाला केलेला विरोध म्हणजे ऐतिहासिक प्रतिकार आणि इतर देशांमधील नागरिकांनी केलेल्या विरोधाला गुन्हेगारी अथवा दहशतवादाचे रुप देणे ही बाब माध्यमांचा दुटप्पीपणा दाखवून देते, अशी तीव्र टीका होऊ लागली आहे.

leave a reply