अमेरिकी हवाईहद्दीतील उडत्या वस्तूंची चौकशी करण्यासाठी ‘स्पेशल युएफओ टास्क फोर्स’ची स्थापना

चीनच्या ‘स्पाय बलून’मधील इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स ताब्यात घेतले

US spy baloonवॉशिंग्टन – गेल्या तीन दिवसात अमेरिका व कॅनडाच्या हवाईहद्दीत आढळलेल्या उडत्या वस्तूंच्या (अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्टस्‌‍) घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नव्या ‘स्पेशल युएफओ टास्क फोर्स’च्या स्थापनेची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या आदेशावरून या पथकाची उभारणी करण्यात येत असल्याचे ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सांगितले. दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी पाडलेल्या चिनी स्पाय बलूनमधील संवेदनशील सेन्सर्ससह इलेक्ट्रॉनिक यंत्रणा ताब्यात घेतल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस उत्तर अमेरिकेच्या हवाईहद्दीत तीन ‘युएचएओ’(अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्ट) आढळले होते. अमेरिका तसेच कॅनडाच्या हवाईदलांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत हे ‘युएचएओ’ज्‌‍ क्षेपणास्त्र डागून पाडण्यात आले. मात्र शांतता काळात अमेरिका व कॅनडाच्या हवाईहद्दीत अशा रितीने अनोळखी उडत्या वस्तू आढळण्याची घटना खळबळ उडविणारी ठरली आहे. या घटनाक्रमापूर्वी एक आठवडा अमेरिकेच्या हद्दीत चिनी स्पाय बलून टेहळणी करताना दिसले होते. त्यामुळे एकापाठोपाठ अनोळखी वस्तू दिसण्याच्या घटनांमागील गूढ अधिकच वाढले आहे.

US airspaceया घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी अमेरिकेने आता ‘स्पेशल युएफओ टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. नव्या टास्क फोर्समध्ये ‘पेंटॅगॉन’, ‘फेडरल ॲव्हिएशन ऑथोरिटी’, ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ यासह इतर यंत्रणांमधील अधिकारी तसेच तज्ज्ञांचा समावेश असेल, असे नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या सुरक्षेला असलेला ‘युएचएओ’ज्‌‍च्या धोक्याबाबत नवा टास्क फोर्स अहवाल देईल, असेही किरबाय यांनी नमूद केले. अमेरिकेने क्षेपणास्त्र डागून उडविलेले ‘युएचएओज्‌‍’ वर्तुळाकार तसेच अष्टकोनी असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे. मात्र त्याचे अवशेष अद्यापही अमेरिका व कॅनडाच्या शोधपथकांना मिळालेले नाहीत.

यापूर्वी अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ व संरक्षण विभागाने २०२१ साली परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना केली होती. या टास्क फोर्सने उडत्या तबकड्यांशी संबंधित एकूण ५१० घटनांची नोंद झाल्याची माहिती नुकतीच दिली होती. गेल्या महिन्यात सादर केलेल्या अहवालानुसार, गेल्या दीड वर्षात जवळपास ५००हून अधिक घटनांची नोंद झाली आहे. त्यातील ३६६ घटना पूर्णपणे नव्या असून जून २०२१ नंतरच्या २४७ घटनांचा यात समावेश आहे. यातील १७१ घटनांची नोंद ‘कोणतेही स्पष्टीकरण नसलेल्या’ अशा शीर्षकाखाली करण्यात आली आहे.

दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी पाडलेल्या चीनच्या ‘स्पाय बलून’चे अवशेष अमेरिकी शोधपथकाच्या हाती लागले आहेत. त्यात संवेदनशील सेन्सर्ससह इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा समावेश असल्याचे अमेरिकी सूत्रांकडून सांगण्यात आले.

leave a reply