महागाईसह नाटो व युक्रेन युद्धाविरोधात युरोपिय देशांमध्ये तीव्र निदर्शने

- ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीत हजारोजण रस्त्यावर उतरले

पॅरिस/बर्लिन/लंडन – रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच युरोपिय जनतेकडून त्याला मिळणारे समर्थन हळुहळू घटत चालल्याचे संकेत मिळत आहेत. युरोपियन नेते व माध्यमे रशियाचा पराभव होईपर्यंत युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याची ग्वाही देत असले तरी युरोपियन जनता मात्र युक्रेन युद्धाला कंटाळली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेले इंधनाचे दर, त्यामुळे उडालेला महागाईचा भडका, वीजटंचाई व आर्थिक मंदीचे सावट यामुळे युरोपिय देशांमधील जनता हवालदिल झाली असून मोठ्या संख्येने युद्धाला विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे. युरोपातील आघाडीचे देश असणाऱ्या ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम यासारख्या देशांमध्ये युद्ध व युद्धाचा पुरस्कार करणाऱ्या नाटोविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.

काही दिवसांपूर्वी जर्मनीच्या म्युनिक शहरात पार पडलेल्या सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर जर्मनीतील काही शहरांमध्ये युक्रेन युद्धाला विरोध करणारी निदर्शने झाली होती. हे लोण युरोपातील इतर देशांमध्येही पसरण्यास सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांमध्ये फ्रान्स, बेल्जियम, पोर्तुगाल, इटली व ब्रिटन या देशांमधील विविध शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी हे युक्रेनला शस्त्रसहाय्य पुरविणारे नाटोचे आघाडीचे सदस्य देश आहेत. युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याच्या मुद्यावर या देशांनी घेतलेली भूमिका व निर्णय युरोपिय देशांसाठी निर्णायक ठरले होते. त्यामुळे या देशांमध्ये होणारी निदर्शने लक्ष वेधून घेत आहेत.

शनिवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये 10 हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाल्याचा दावा स्थानिक गटांनी केला. जर्मनीकडून देण्यात येणाऱ्या शस्त्रांमुळे दररोज हजारो जणांचा बळी जात असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ ढकलले जात आहे, असा ठपका निदर्शकांनी ठेवला. ‘निगोशिएट, नॉट एस्कलेट’ व ‘नॉट अवर वॉर’ असे फलकही मोठ्या प्रमाणात झळकविण्यात आले. रविवारी फ्रान्सची राजधानी पॅरिस तसेच ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. फ्रान्समध्ये राजधानी पॅरिससह देशभरातील 30 विविध शहरांमध्ये निदर्शने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. फ्रान्समधील निदर्शनांमध्ये युक्रेन युद्धाबरोबरच फ्रान्सच्या नाटोतील सदस्यत्वाला विरोध दर्शविणारे फलक झळकविण्यात आले तसेच घोषणाही देण्यात आल्या. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कारभारावर नाराजी असणारे गटही यात सहभागी झाले होते. ‘मॅक्रॉन गेट आऊट’ अशा घोषणा देणाऱ्या निदर्शकांकडून यावेळी नाटो तसेच युरोपिय महासंघाच्या झेंड्यांना काळे फासण्यात आले.

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये जवळपास पाच हजार जण सामील झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात ‘पीस नॉट वॉर’ अशा आशयाचे फलक मोठ्या प्रमाणात झळकविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स, पोर्तुगाल तसेच इटलीतही युक्रेन युद्धाविरोधात निदर्शने झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

leave a reply