‘डीआरडीओ’कडून ‘एचएसटीडीव्ही’ची यशस्वी चाचणी

शत्रूचे सुरक्षा कवच सहज भेदता येणार

नवी दिल्ली – भारताच्या ‘संरक्षण संशोधन विकास संस्थे’ने (डीआरडीओ) सोमवारी ‘हायपरसोनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेईकल’ची (एचएसटीडीव्ही) अर्थात हायपरसोनिक टेकोलॉजीची यशस्वी चाचणी केली. हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून यामुळे भारत पुढच्या पाच वर्षात स्क्रॅमजेट इंजिनच्या सहाय्याने हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करु शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले. ‘एचएसटीडीव्ही’च्या या यशस्वी चाचणीमुळे भारताचा अमेरिका, रशिया आणि चीनसोबत हायपरसोनिक मिसाईल क्लबमध्ये समावेश झाला आहे.

'एचएसटीडीव्ही

सोमवारी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांनी ‘डीआरडीओ‘ने ओडिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन ‘एचएसटीडीव्ही’ची यशस्वी चाचणी केली. अग्नी मिसाईल बुस्टरने ३० किलोमीटर उंचावर हायपरसोनिक व्हेईकल झेपावले. शास्त्रज्ञांनी निश्चित केलेले सर्व निकष पार करुन ‘एचएसटीडीव्ही’ने ध्वनीपेक्षा सहापट वेगाने प्रवास केला. या ‘एचएसटीडीव्ही’च्या चाचणीसाठी पहिल्यांदाच देशात निर्मिती केलेल्या प्रपल्शन सिस्टीमचा वापर करण्यात आला. ‘एचएसटीडीव्ही’ने स्क्रॅमजेट इंजिनच्या सहाय्याने झेप घेतली असून भविष्यात हे ‘एचएसटीडीव्ही’ उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी देखील उपयुक्त ठरेल.

'एचएसटीडीव्ही‘एचएसटीडीव्ही’ अर्थात हायपरसोनिक टेक्‍नोलॉजीच्या या यशस्वी चाचणीमुळे भारताकडे शत्रूचे सुरक्षा कवच भेदण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुरक्षा कवच भेदणे शक्य होत नाही. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित झाल्यापासून त्यांच्यावर लक्ष ठेवता येते. त्याचबरोबर अशी क्षेपणास्त्रे माग घेऊन भेदता देखील येतात. पण हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा माग काढणे अतिशय अवघड असते, सदर क्षेपणास्त्रे निश्चित मार्गाने प्रवास करीत नाहीत. त्यात या क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीपेक्षा सहा पट अधिक असल्यामुळे त्यांना भेदणेही अवघड असते. त्यामुळे शत्रूला कळण्याआधीच सुरक्षा कवच भेदण्याची क्षमता संरक्षणदलांना प्राप्त होते. सध्या चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘एचएसटीडीव्ही’ची चाचणी महत्त्वाची ठरते.

या चाचणीमुळे भारत हायपरसोनिक क्लबमध्ये चौथा देश बनला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीआरडीओ’च्या वैज्ञानिकांचे कौतुक करुन फार कमी देशांकडे हे असे सामर्थ्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर ‘डीआरडीओ’ची ही सर्वोत्तम कामगिरी असून हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. अंत्यत गुंतागुंतीचे आणि कठीण तंत्रज्ञान विकसित करुन भारताने आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे , असा आत्मविश्वास संरक्षणमंत्री सिंग यांनी व्यक्त केला.

leave a reply