लष्कराकडून स्वदेशी बनावटीच्या कार्बाइनची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – ‘संरक्षण संशोधन विकास संस्थे’ने (डीआरडीओ) भारतीय लष्करासाठी विकसित केलेल्या ‘5.5 बाय 30 एमएम प्रोटेक्टिव्ह कार्बाइन’ची यशस्वी चाचणी घेतली. चाचणी दरम्यान या ‘कार्बाइन’ने सर्व निकष पूर्ण केल्याने या शस्त्राचा लष्करात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

स्वदेशी बनावटीची ‘जॉर्इंट व्हेंचर प्रोट्रेक्टिव्ह कार्बाइन’ (जेव्हीपीसी) हे स्वयंचलित शस्त्र आहे. या कार्बाइनची मारक क्षमता 100 मीटरपर्यंत असून प्रति मिनीट 700 गोळ्यांचा मारा याद्वारे केला जाऊ शकतेो. तसेच ही कार्बाईन हलक्या वजनाची आहे. याचे वजन सुमारे तीन किलो आहे. ‘डीआरडीओ’ने भारतीय लष्कराच्या मागणीनुसार ही कार्बाइन विकसित करण्यात आले आहे.

अंतिम टप्प्यातील कार्बाइनची चाचणी हिवाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत घेण्यात आली. सात डिसेंबर रोजी ही चाचणी पार पडल्याचे संरक्षणमंत्रालयाने म्हटले. लवकरच कार्बाइन लष्कराच्या ताफ्यात दाखल होईल. लष्कराला दहशतवादविरोधी लढ्यात हे शस्त्र उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लखनऊमध्ये पार पडलेल्या ‘डिफेन्स एक्स्पो’ दरम्यान ही कार्बाइन प्रथम प्रदर्शित केली होती. याआधी कार्बाइनच्या पार पडलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने याच्या खरेदीसाठी हालचाली देखील सुरु केल्या आहेत.

leave a reply