स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास बंद केला

इस्लामाबाद – आपला पाकिस्तानातील दूतावास स्वीडनने अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. आपले राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्वीडनच्या दूतावासाने जाहीर केले. तसेच हा दूतावास कधी सुरू होणार, याचे उत्तर दिले जाणार नाही, असेही या दूतावासाने स्पष्ट केले. स्वीडनमध्ये शिक्षण घेऊ पाहणाऱ्या पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार असल्याचे दावे केले जातात. मात्र स्वीडनचा दूतावास बंद झाल्याने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनल्याचा संदेश साऱ्या जगाला मिळालेला आहे. त्यामुळे इतर देश देखील स्वीडनचे अनुकरण करून पाकिस्तानातील दूतावास बंद करण्याची दाट शक्यता आहे.

स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास बंद केलाथेट उल्लेख केलेला नसला तरी पाकिस्तानातील सध्याची स्थिती भयावह बनली आहे. सरकार व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या इम्रान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’मध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष पुढच्या काळात रक्तरंजित बनेल, असे दावे केले जातात. त्यातच पाकिस्तानात निवडणूक घेतली जावी, असे आदेश या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानात भयंकर रक्तपात माजण्याची शक्यता आहे. त्यातच पाकिस्तानच्या रुपयाची घसरण झाली असून एका डॉलरसाठी २९० पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत.

यामुळे भडकलेल्या महागाईचे परिणाम पाकिस्तानात दिसू लागले आहेत. गव्हाचे पीठ मिळवण्यासाठी रांगेत उभे राहून आत्तापर्यंत २१ जणांचे बळी पाकिस्तानात गेल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात ही संख्या दोनशेच्याही पुढे असल्याचे दावे काही भारतीय विश्लेषकांनी पाकिस्तानातील सूत्रांच्या हवाल्याने केले आहेत. यामुळे पाकिस्तानात अराजक सुरू झाले असून परदेशी नागरिकांसाठी पाकिस्तान अधिकाधिक असुरक्षित बनत चालला आहे. त्यातच दहशतवाद्यांचे व कट्टरपंथियांचे हल्ले रोखण्यात पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत आहेत.

पाकिस्तानी जनतेचाच आपल्या देशावर व यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही. यामुळे शक्य असलेला प्रत्येकजण पाकिस्तान सोडून इतर देशांमध्ये धाव घेत आहे. अशा परिस्थितीत स्वीडनचा पाकिस्तानातील दूतावास बंद करण्याचा निर्णय अनपेक्षित ठरत नाही. उलट इतर देश देखील स्वीडनचे अनुकरण करू शकतात. यामुळे पाकिस्तान असुरक्षित बनल्याचा संदेश जगाला मिळालेला आहे. सध्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळविण्यासाठी धडपडत आहे. मात्र याआधी पाकिस्तानला २३ वेळा कर्जसहाय्य पुरविणाऱ्या नाणेनिधीने यावेळी पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास नकार दिल्याचे दिसते.

पाकिस्तानच्या आजच्या अवस्थेला आपल्या देशाचे नेतेच जबाबदार असल्याची टीका माध्यमे करीत आहेत. तर काही विश्लेषकांनी यासाठी सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरले आहे. राजकीय स्वार्थाने आंधळे झालेले नेते देशाचा विचार करायलाच तयार नाहीत. पाकिस्तान डबघाईला आलेला असताना देखील हे नेते आपले स्वार्थांध धोरण सोडायला तयार नाहीत, अशी जळजळीत टीका या विश्लेषकांनी केली आहे. त्यामुळे अधोगतीखेरीज पाकिस्तानचे दुसरे भवितव्य नाही, अशी हताश प्रतिक्रिया हे विश्लेषक देत आहेत.

हिंदी

 

leave a reply