रशियाच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी स्वीडनच्या संरक्षणखर्चात तब्बल ४० टक्क्यांची वाढ

संरक्षणखर्चात

स्टॉकहोम/मॉस्को – रशियाच्या आक्रमक कारवायांना तोंड देण्यासाठी स्वीडनच्या संसदेने आपल्या संरक्षणखर्चात तब्बल ४० टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर स्वीडन आपला संरक्षणखर्च ११ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविणार आहे. स्वीडनकडून संरक्षणखर्चात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गेल्या ७० वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे. गेल्याच आठवड्यात स्वीडीश संसदेतील प्रमुख पक्षांनी ‘नाटो सदस्यत्व’ स्वीकारण्याच्या प्रस्तावाला समर्थन असल्याची भूमिकाही घेतली होती.

गेल्या काही वर्षात रशियाच्या पाणबुड्या, युद्धनौका तसेच लढाऊ विमाने स्वीडनच्या हद्दीनजिक धडका मारण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी रशियाची एक प्रगत युद्धनौका अनेक दिवस स्वीडनच्या सागरी हद्दीनजिक टेहळणी करीत होती, असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. रशियाने सदर वृत्त फेटाळून लावले होते. मात्र या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्वीडनने आपल्या संरक्षण धोरणात बदल करण्यास सुरुवात केली होती.

संरक्षणखर्चात

२०१७ साली स्वीडनने एक विशेष आयोग स्थापन करून त्यावर संरक्षणसिद्धतेसाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या आयोगाने २०१८ साली आपला अहवाल संसदेला सादर केला होता. त्यात ‘टोटल डिफेन्स’ व ‘टोटल मोबिलायझेशन’ या घटकांसह स्वीडनचा संरक्षणखर्च पुढील १५ वर्षांमध्ये १४ अब्ज डॉलर्सवर नेण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी स्वीडनने २०१८ ते २०२० या तीन वर्षांमध्ये संरक्षणखर्च दरवर्षी प्रत्येकी पाच कोटी संरक्षणखर्चातडॉलर्सने वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी सुचविण्यात आलेली वाढ देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी व अभूतपूर्व वाढ ठरली आहे. ‘रशियाची लष्करी क्षमता पुढील दशकभरात प्रचंड प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी क्रिमिआचा ताबा व बाल्टिक देशांमधील लष्करी हालचालीही चिंता वाढविणार्‍या आहेत. कॅलिनिनग्रॅडच्या तळावरही रशियाने मोठ्या प्रमाणात संरक्षणतैनाती केली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वीडनकडून योग्य संदेश जाणे महत्त्वाचे आहे’, अशा शब्दात स्वीडनने संरक्षणखर्चातील वाढीचे समर्थन केले आहे.

संरक्षणखर्चात वाढ करतानाच लष्कराची क्षमताही सध्याच्या ५५ हजारांपासून ९० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी रद्द केलेल्या अनेक लष्करी तुकड्यांचे पुनरुज्जीवनही करण्यात येणार आहे. हवाईदल व नौदलाची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून त्यात प्रगत क्षेपणास्त्रांचाही समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वीच स्वीडनने अमेरिकेकडून ३.२ अब्ज डॉलर्सच्या चार ‘पॅट्रिऑट एअर अ‍ॅण्ड मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स’ही खरेदी केल्या होत्या. गेल्या वर्षी स्वीडनने मस्को भागातील ‘टॉप सिक्रेट अंडरग्राऊंड नेव्हल बेस’ही सक्रिय केला होता.

leave a reply