तालिबान व तेहरिकची पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाची धमकी

इस्लामाबाद – ‘तेहरिक-ए-तालिबान’चे हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिलेली ही धमकी अफगाणिस्तानातील तालिबानने तसेच ‘तेहरिक-ए-तालिबान’ने देखील गंभीरपणे घेतली आहे. पाकिस्तानने असा प्रकार केलाच, तर भारताबरोबरच्या 1971 साली झालेल्या युद्धातील लज्जास्पद पराभवापेक्षा अधिक मानहानी पाकिस्तानच्या लष्कराला सहन करावी लागेल, असे ‘तेहरिक’ने बजावले आहे. तर पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे अफगाणिस्तानातील तालिबानने म्हटले आहे.

Defeat Pakistanपाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात तसेच इतर ठिकाणीही तेहरिकने दहशतवादी हल्ल्यांचा सपाटा लावला असून पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि अधिकारी तेहरिकच्या निशाण्यावर आहेत. तेहरिकच्या हल्ल्यात नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात 44 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्याच एका अभ्यासगटाने ही माहिती दिली. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकार व लष्कराचाही थरकाप उडाला असून केवळ जनतेला धीर देण्यासाठी पाकिस्तानचे नेते व लष्करी अधिकारी मोठमोठ्या घोषणा करीत आहेत. यामध्ये दहशतवाद मूळापासून उपटून टाकण्याच्या व दहशतवाद्यांवर कठोर कारवाईच्या घोषणेचा समावेश आहे. बोलताना भरात आलेले पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी अफगाणिस्तानात शिरून तेहरिक-ए-तालिबानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची घोषणा केली.

त्याचे पडसाद अफगाणिस्तानातून उलटले असून तालिबानने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची पर्याप्त क्षमता आपल्याकडे असल्याची जाणीव करून दिली. तर तेहरिकने त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणजे तुर्कीचे हल्ले सहन करणारे सिरियातील कुर्दवंशिय नाहीत, असा टोला पाकिस्तानला लगावला. महासत्तांचे थडगे असलेला देश अशी अफगाणिस्तानची ओळख आहे. तेव्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ल्याचा विचारही करू नये, असे तेहरिकचा नेता अहमद यासिर याने धमकावले. तरीही पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ले चढविण्याचा विचार केलाच, तर 71 सालच्या युद्धात भारताकडून स्वीकाराव्या लागलेल्या लज्जास्पद पराभवापेक्षाही अधिक दारूण पराभव पाकिस्तानच्या वाट्याला येईल, असे अहमद यासिर पुढे म्हणाला.

इतकेच नाही तर अहमद यासिर याने सोशल मीडियावर ही धमकी देत असताना, 1971 साली पाकिस्तानी लष्कराचे जनरल अमिर अब्दुलखान नियाझी भारतासमोर शरणांगतीच्या करारावर स्वाक्षरी करीत असतानाचा तो ऐतिहासिक फोटोग्राफ देखील प्रदर्शित केला. यावर भारतातूनही प्रतिक्रिया येत असून भारतीय नेटकर पाकिस्तानची खिल्ली उडवित आहेत. काही दिवसांपूर्वी तेहरिकने पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देऊन आपल्या सरकारची घोषणा केली होती. यामध्ये अहमद यासिर याला पाकिस्तानचा उपपंतप्रधान घोषित करण्यात आले होते. त्यामुळे यासिर याने दिलेल्या धमकीकडे पाकिस्तानला दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचवेळी पाकिस्तानचे नेते करीत असलेली विधाने आपण गंभीरपणे घेत असल्याची जाणीव अफगाणिस्तानातील तालिबानने पाकिस्तानला करून दिली आहे.

हिंदी English

leave a reply