‘लश्कर’ व जैश’च्या दहशतवाद्यांना तालिबान सहकार्य करीत आहे

- अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी

सहकार्यकाबुल – ‘अल कायदा, लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांबरोबरील संबंध तालिबानने नाकारले आहे. याबरोबरच आपली प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न तालिबान करीत आहे. पण आजही तालिबानचे दहशतवाद्यांबरोबरील सहकार्य कायम आहे. अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे नंदनवन करण्याची तालिबानची योजना आहे. मात्र आमचे सरकार हे कधीही होऊ देणार नाही’, असे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी बजावले. धोरणात्मकदृष्ट्या अफगाणिस्तान अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणूनच या देशावर शत्रू सूड काढून युद्ध लादत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केला. थेट नाव घेतले नसले तरी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला उद्देशून ही टीका केल्याचे दिसत आहे.

अफगाणिस्तानातील अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाण सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी याआधीही केला होता. पण अमेरिकेची सैन्यमाघार सुरू सहकार्यझाल्यापासून तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले वाढले. तालिबानच्या अफगाणी लष्करावरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटनांचे सहाय्य मिळत आहे. अफगाणिस्तानच्या पाकतिका, हेल्मंड, कंदहार प्रांतात पाकिस्तानातील ‘जैश’ व ‘लश्कर’च्या दहशतवाद्यांनी तळ ठोकल्याचे उघड झाले होते. अफगाणी लष्कराने ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍याने तशी कबुली दिली होती.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी देखील गेल्या आठवड्यात ताश्कंद येथील बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीतच 10 हजार दहशतवादी पाकिस्तानातून अफगाणिस्तानात दाखल झाल्याचा आरोप केला. अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या या आरोपानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा गोंधळ उडाला होता. राष्ट्राध्यक्ष गनी यांच्या आरोपांचे खंडन करण्यात पंतप्रधान इम्रान खान अपयशी ठरले होते. बुधवारी अफगाणी लष्कराच्या कार्यक्रमात बोलताना, राष्ट्राध्यक्ष गनी यांनी थेट उल्लेख न करता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि तालिबानमधील सहकार्यावर टीका केली.

सहकार्यअफगाणिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन करण्याची योजना कधीही यशस्वी होऊ देणार नसल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष गनी यांनी यासाठी अफगाणी लष्कराला आवश्यक ते पूर्ण सहाय्य पुरविण्याचे आश्‍वासन दिले. ‘अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य, समता आणि गेल्या 20 वर्षांमध्ये कमावलेले यश यांची सुरक्षा करणे हेच आपले मुख्य लक्ष्य असेल’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी अफगाणी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पाकिस्तानला जाब विचारला होता. ‘पाकिस्तानला आपल्या देशात एका दिवसासाठी तरी तालिबानची सत्ता चालेल का? नाही ना, मग तेच तालिबानी पाकिस्तान अफगाणींवर थोपविण्याचा प्रयत्न का केला जात आहे?’ असा सवाल अफगाणी राष्ट्राध्यक्षांनी केला होता.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानात हिंसाचार व नासधूस केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. येथील बडाखशान प्रांतात मुलांसाठी बांधलेल्या उद्यानात उभारलेले पुतळे तालिबानने जमिनदोस्त केले. याचे फोटोग्राफ्स समोर आले. तर बलख प्रांतात तालिबान जनतेकडून जबरदस्तीने पैसे गोळा करीत असल्याचे अफगाणी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

leave a reply