तालिबानने शंभरहून अधिक अफगाणी जवानांची हत्या केली

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचा आरोप

अफगाणी जवानांचीन्यूयॉर्क/वॉशिंग्टन – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून गेल्या पाच महिन्यांमध्ये १०० हून अधिक अफगाणी जवानांची निर्घृणरित्या हत्या केली आहे. आधीच्या अफगाणी सरकारच्या सेवेत असलेल्या आणि पाश्‍चिमात्य लष्कराला सहाय्य करणार्‍या अफगाणी जवानांना हेरून तालिबानने हे कृत्य केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुतेरस यांनी केला. तर अमेरिकी नागरिकाची सुटका केल्याशिवाय तालिबानच्या राजवटीला अधिकृतता मिळणे अशक्य असल्याचे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने म्हटले आहे.

आपल्या राजवटीला मान्यता मिळावी, यासाठी तालिबानने आपले प्रयत्न वाढविले आहेत. गेल्या आठवड्यात तालिबानच्या राजवटीचे परराष्ट्र व्यवहार हाताळणारा अधिकारी अमीर मोत्ताकी तालिबानच्या इतर कमांडरसह नॉर्वेच्या भेटीवर गेला होता. ऑस्लो येथील बैठकीत तालिबानने अफगाणी जनतेसाठी मानवतावादी सहाय्य आणि आपल्या राजवटीला अधिकृतता बहाल करण्याची मागणी केली.

तर रशिया देखील तालिबानबरोबर स्वतंत्र चर्चा करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह हे देखील या चर्चेत सहभागी होणार असून ते आधीच राजधानी मॉस्कोत दाखल झाल्याचा दावा केला जातो. रशिया तालिबान आणि सालेह यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या ‘नॉर्दन रेझिस्टन्स फोर्सेस’मध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. तालिबान देखील या चर्चेत सहभागी होणार असल्याचे बोलले जाते.

अफगाणी जवानांचीरशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झमिर काबुलोव्ह यांनी गेल्या ४८ तासांमध्ये केलेली विधाने सूचक ठरतात. रशियन राजधानी मॉस्कोमधील अफगाणिस्तानच्या दूतावासात तालिबान आपले प्रतिनिधी पाठविण्याची शक्यता रशिया नाकारत नाही, असे काबुलोव्ह यांनी म्हटले आहे. तसेच ‘अफगाणिस्तानची राष्ट्रीय संपत्ती गोठवून पाश्‍चिमात्य देश तालिबानला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडत आहे. राष्ट्रीय संपत्ती गोठवून पाश्‍चिमात्य देश अफगाणिस्तानातील मानवतावादी संकट अधिक भडकावत आहे’, अशी टीका काबुलोव्ह यांनी केली.

बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तानची सुमारे साडेनऊ अब्ज डॉलर्सची राष्ट्रीय संपत्ती गोठविली आहे. रशियाच्या विशेषदूतांनी उघड उल्लेख करण्याचे टाळले असले तरी यावरून अमेरिकेला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अमेरिकी नागरिकाची सुटका करण्याची मागणी केली आहे. अमेरिकी नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास अजिबात खपवून घेणार नसल्याचे बायडेन यांनी धमकावले. तसेच आपल्या राजवटीला मान्यता हवी असेल तर तालिबानने अमेरिकी नागरिकाची सुटका करावी, असे बायडेन म्हणाले. दोन वर्षांपूर्वी तालिबानने अमेरिकी नागरिकाचे अपहरण केले होते. पण अफगाणिस्तानात तालिबानने राजवट प्रस्थापित केल्यानंतर बायडेन प्रशासनाने पहिल्यांदाच जाहीरपणे अमेरिकन नागरिकाच्या सुटकेची मागणी केली आहे.

leave a reply