पाकिस्तानी लष्कराला पिटाळून तालिबानचा वाखण कॉरिडॉरवर ताबा

काबुल – ड्युरंड लाईनच्याही व्यतिरिक्त तालिबान आणि पाकिस्तानच्या लष्करात असलेला तणाव समोर येत आहे. पाकिस्तानच्या लष्कराने वाखण कॉरिडॉर भागात उभारलेले पिलर तालिबानने हातोड्याचे घण घालून पाडून टाकले. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या वाटाघाटीनंतर तालिबानने हा पहिला हल्ला चढविला आहे. वाखण कॉरिडॉरवरील तालिबानच्या या नियंत्रणामुळे अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात आपली कक्षा विस्तारण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना हादरा बसल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

taliban-wakhan-corridorगेल्या आठवड्यात अफगाणिस्तान व पाकिस्तानातील सोशल मीडियावर तालिबानचा व्हिडिओ वायरल झाला होता. यामध्ये तालिबानचे कमांडर अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील बादखशान प्रांतातील ‘वाखण’ भागात मोठ्या संख्येने जमा झाले होते. यापैकी एका कमांडरने वाखण सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्कराने उभारलेला पिलर हातोड्याचे घण घालून पाडून टाकला. यावेळी तालिबानने घोषणा दिल्या तसेच एके47 रायफल्सनी हवेत गोळीबार करून या कारवाईचा जल्लोष केला. पाकिस्तानच्या लष्कराने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अफगाणी माध्यमांनी तालिबानच्या हवाल्याने यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली.

गेल्या वर्षी तालिबानने काबुलची राजवट ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान निर्माण झालेल्या अस्थैर्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने वाखण कॉरिडॉर भागात पिलर उभारले होते. हे पिलर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे असून ते नष्ट करण्यासाठी केलेली कारवाई योग्यच होती, असे तालिबानचे म्हणणे असल्याचा दावा अफगाणी माध्यमांनी केला आहे. आत्तापर्यंत तालिबानने पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा, फाटा या प्रांतांतील ड्युरंड लाईनजवळील काटेरी कुंपण, लष्करी चौक्या उद्‌‍ध्वस्त केल्या होत्या. पण यावेळी तालिबानने थेट वाखण कॉरिडॉर येथे कारवाई केल्यामुळे पाकिस्तान तसेच चीनलाही धक्का बसल्याचा दावा केला जातो.

वाखण कॉरिडॉर बराचसा भाग अफगाणिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये येतो. हा पाकिस्तानचा नाही तर आपला भूभाग असल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र सध्या त्यावर पाकिस्तानचा अवैध ताबा आहे. पाकिस्तान व चीन या ठिकाणी पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवित आहेत. त्याचा वापर करून मध्य आशियाई देशांमध्ये व्यापारी विकसित करण्याची पाकिस्तानची योजना होती. यासाठी गेल्या वर्षी अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या अराजकाचा पाकिस्तानी लष्कराने फायदा घेतला होता. यामुळे चीनला देखील झिंजियांगमार्गे अफगाणिस्तानात प्रवेश करणे सोपे होणार होते. पण तालिबानने वाखण येथे ही कारवाई करून दोन्ही देशांना धक्का दिल्याचे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे शिष्टमंडळ अफगाणिस्तानमध्ये दाखल झाले होते. तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांनी तेहरिक-ए-तालिबान आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली होती. पण ड्युरंड लाईनच्या मुद्यावरुन तालिबानने तेहरिकची बाजू उचलून धरून पाकिस्तानला खडसावले होते. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानला पाकिस्तानात अपेक्षित असलेले सरकार व व्यवस्था सत्तेवर नाही. त्यामुळे लवकरच अफगाणिस्तानप्रमाणे पाकिस्तान देखील भ्रष्ट राजकारणी व लष्करापासून मुक्त करण्यात येईल, असा इशारा तालिबानने दिला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच तालिबानने वाखण येथे कारवाई करून पाकिस्तानला आपला इशारा पोकळ नसल्याचे दाखवून दिले आहे.

leave a reply