ताजिकिस्तान, उझबेकिस्तानला तालिबानची धमकी

काबुल – ‘अफगाणिस्तानच्या हवाईदलांची विमाने आणि हेलिकॉप्टर्स परत करा. यासाठी उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानने आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. अन्यथा आपली विमाने परत मिळविण्यासाठी तालिबानला आवश्‍यक ती कारवाई करावी लागेल`, अशी धमकी तालिबानच्या राजवटीचा संरक्षणमंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद याने दिली.

ताजिकिस्तान, उझबेकिस्तानला तालिबानची धमकीगेली काही वर्षे अफगाणिस्तानच्या हवाईदलामध्ये 161 लढाऊ विमाने तसेच हेलिकॉप्टर्स तैनात होती. यामध्ये ब्राझिलियन बनावटीची व वजनाला हलकी असलेली ए-29 टूकानो लढाऊ विमाने तसेच अमेरिकन बनावटीची ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. अफगाणिस्तानच्या तत्कालिन हवाईदलाने तालिबानविरोधी कारवाईसाठी या विमाने व हेलिकॉप्टर्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. पण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबान राजधानी काबुलच्या दिशेने प्रवास करू लागल्यानंतर अफगाणी हवाईदलाच्या वैमानिकांनी आपले साथीदार व परिवारासह विमाने व हेलिकॉप्टर्स घेऊन शेजारी देशांमध्ये धाव घेतली. या अफगाणी वैमानिकांनी जवळपास 80 विमाने व हेलिकॉप्टर्स ताजिकिस्तान व उझबेकिस्तान या शेजारी देशांमध्ये नेल्याचा दावा केला जातो. अफगाणी लष्कराच्या जवानांनी देखील डझनावरी अमेरिकन बनावटीची हम्वी लष्करी वाहने घेऊन इराणमध्ये पळ काढला होता.

अफगाणिस्तानची संपत्ती असलेली ही विमाने व हेलिकॉप्टर्स परत मिळविण्यासाठी तालिबानने हालचाली सुरू केल्या आहेत. तालिबानच्या राजवटीचा संरक्षणमंत्री मुल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद याने मंगळवारी राजधानी काबुलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ताजिकिस्तान व उझबेकिस्तानला धमकावले. ताजिकिस्तान, उझबेकिस्तानला तालिबानची धमकीया दोन्ही शेजारी देशांनी कुठलेही आडेवेडे न घेता ही विमाने व हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानला परत करावी आणि तालिबानला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये, असे मुल्ला याकूबने बजावले.

त्याचबरोबर अफगाणिस्तानातून पळून गेलेले हवाईदलाचे वैमानिक व इंजिनिअर्सने परत मायदेशी परतावे, असे आवाहन याकूबने केले. हे सारे अफगाणिस्तानचा गौरव असून त्यांना मोठ्या आदराने पुन्हा हवाईदलात सामील केले जाईल, असे आश्‍वासन याकूबने दिले. याआधीही तालिबानने अफगाणी लष्कराच्या माजी जवानांना शरण येण्याचे व आपल्या कमांडमध्ये परतण्याचे आवाहन केले होते. पण काही ठिकाणी तालिबान्यांनी अफगाणी जवानांची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे अफगाणिस्तानची जनता, जवान व माजी नेते तालिबानच्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवायला अजिबात तयार नाहीत.

ताजिकिस्तान, उझबेकिस्तानला तालिबानची धमकीअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबान एक लाख जणांचा सहभागअसलेले संरक्षणदल उभारीत आहे. आत्तापर्यंत तालिबानने स्पेशल फोर्सेसच्या धर्तीवर ‘313 बद्री बटालियन` तयार केली आहे. तर गेल्या आठवड्यात या स्पेशल फोर्सेसच्या सहाय्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांची बटालियन उभारल्याची घोषणा तालिबानच्या प्रवक्त्याने केली होती. अफगाणिस्तानच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या देशांमध्ये घुसून हल्ले चढविण्याची जबाबदारी या बटालियनवर असेल, असे तालिबानने बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर, तालिबानने ताजिकिस्तान व उझबेकिस्तानला दिलेली धमकी अतिशय गंभीर ठरते.

दरम्यान, इराणमध्ये तालिबानचा कमांडर आणि अहमद मसूद यांच्यात भेट झाल्याचे ‘नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट-एनआरएफ`ने जाहीर केले. तसेच अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन करावे, अशी मागणी केल्याचे एनआरएफने सांगितले. पण तालिबानमधील प्रभावशाली गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी याला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे तालिबानने म्हटले आहे.

leave a reply