जॉर्डनच्या मध्यस्थीने इस्रायल व पॅलेस्टाईनची चर्चा

Jordanian mediation जेरूसलेम – जॉर्डनच्या मध्यस्थीने इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींची चर्चा सुरू झाली आहे. वेस्ट बँकमधून इस्रायलवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली हे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलने अधिकच कठोर निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये दहशतवाद्यांवर हवाई हल्ले चढविण्याबरोबरच पूर्व जेरूसलेममध्ये ज्यूधर्मियांसाठी सुरू असलेल्या हजारो बांधकामांना अधिकृतता देण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. पॅलेस्टाईनचे नेते इस्रायलचा हा निर्णय म्हणजे आपल्यावरील अतिक्रमण असल्याचे सांगून याविरोधात अखेरपर्यंत लढा देण्याची भाषा बोलू लागले आहेत. अमेरिका व युरोपिय देशांनीही यावर गंभीर चिंता व्यक्त केली असून याचे विपरित परिणाम होईल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, जॉर्डनच्या मध्यस्थीने सुरू झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरते.

Shin Bet head Ronen Barया वर्षाच्या सुरूवातीपासून आत्तापर्यंत इस्रायलने केलेल्या कारवाईत 62 पॅलेस्टिनी ठार झाले असून यामध्ये महिला व मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईनमधील जहाल संघटना इस्रायलमध्ये घातपात घडवित असून या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपले निरपराध नागरिक बळी पडत असल्याचा आरोप इस्रायलचे सरकार करीत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दहशतवाद मुळापासून निखंदून टाकल्याखेरीज ही समस्या संपणार नसल्याचा निर्वाळा दिला होता. यासाठी इस्रायल आवश्यक असलेली पावले उचलताना कचरणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावले होते. तसेच इस्रायलने काय करायचे याच्या इतर देशांनी दिलेल्या सूचना यापुढे आपला देश मानणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला होता.

अमेरिका व युरोपातील प्रमुख देश पूर्व जेरूसलेममध्ये इस्रायल करीत असलेल्या बांधकामांवर नाराजी व्यक्त करीत आहेत. यामुळे इस्रायल व पॅलेस्टाईनची समस्या सोडविण्यासाठी मांडण्यात आलेला द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला धक्के बसत असल्याचे अमेरिका व युरोपिय देशांनी बजावले होते. पण सध्या तरी इस्रायल या देशांची पर्वा करण्याच्या तयारीत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टिनींच्या बाजूने मंजूर केलेल्या ठरावालाही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी कडाडून विरोध केला होता. तर पॅलेस्टाईनच्या जहाल संघटना तर इस्रायल जमीनदोस्त करण्याची भाषा करीत आहेत.

अशा परिस्थितीत जॉर्डनच्या मध्यस्थीने सुरू झालेल्या या चर्चेकडे आखाती क्षेत्रातील देशांसह जगभरातील इतर प्रमुख देशांचेही लक्ष लागलेले आहे.

leave a reply