‘तेहरिक-ए-तालिबान’ पाकिस्तानात रक्तरंजित हल्ल्यांचे सत्र सुरू करणार

रक्तरंजित हल्ल्यांचे सत्रइस्लामाबाद – ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानच्या लष्करासोबतची संघर्षबंदी संपुष्टात आल्याची घोषणा केली. तेहरिकच्या नेत्यांनी आपल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच पाकिस्तानात ‘तेहरिक’च्या घातपाताचे भीषण सत्र सुरू होईल. हा रक्तपात टाळण्यासाठी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करून पाहिला होता. मात्र या वाटाघाटी यशस्वी ठरू शकलेल्या नाहीत. अफगाणिस्तानातील तालिबाननेच ‘तेहरिक’ला पाकिस्तानात घातपात माजविण्यासाठी पूर्णपणे मोकळीक दिल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला विभागणारी ड्युरंड लाईन सीमा आपल्याला मान्य नसल्याचे तालिबानने याआधीच जाहीर केले होते. ही सीमा कुंपणाने सील करण्याचे व इथे लष्करी चौक्या बसवण्याचे पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्नही तालिबानला मान्य नाहीत. म्हणूनच ड्युरंड लाईनवर तालिबान व पाकिस्तानी लष्करामध्ये चकमकी झडल्या होत्या. हा वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानातील तालिबानचीच शाखा असलेल्या ‘तेहरिक’ला पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करण्याची मोकळीक तालिबानच्या नेत्यांनी दिल्याचे दावे केले जातात. यामुळेच तेहरिकने पाकिस्तानात हल्ल्यांचे सत्र सुरू करण्याचे आदेश आपल्या दहशतवाद्यांना दिल्याचे दिसते आहे.

अफगाणिस्तानात कारवाई करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला सहाय्य करीत आहे. पाकिस्तानच्याच सहाय्यामुळे अल कायदाचा प्रमुख आयमन अल जवाहिरी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाल्याचा आरोप तालिबानने केला होता. याची किंमत पाकिस्तानला चुकती करावीच लागेल, असे तालिबानचे नेते धमकावत आहेत. म्हणूनच तेहरिकचा वापर करून तालिबान पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडविण्याची तयारी करीत आहे. काही महिन्यांपूर्वी, तालिबानची मनधरणी करून तेहरिकच्या कारवाया रोखण्यात पाकिस्तानला कसेबसे यश मिळाले होते. पण आता परिस्थिती बदलली आह. काही आठवड्यांपासून तेहरिकचे दहशतवादी अफगाणिस्तानलगतच्या पाकिस्तानच्या ‘खैबर पख्तुनख्वा’ प्रांतात खंडणीची मागणी करू लागल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.

शहाणपणा दाखवून खंडणी द्या, अन्यथा त्याचे भीषण परिणाम होतील, असे तेहरिकचे दहशतवादी खैबर पख्तुनख्वामधल्या व्यावसायिकांना बजावत आहेत. यामागे अफगाणिस्तानातील तालिबानचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी केला होता. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानचे नेते आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ताब्यात घेण्याच्या धमक्या देऊ लागले आहेत. ही तालिबानच्या ताब्यात आलेली दुसरी राजधानी असेल, असा दावा हे तालिबानी नेते करीत आहेत. मात्र पाकिस्तानी माध्यमांमधील काही तालिबानसमर्थक पत्रकारांनी या स्थितीला पाकिस्तानची अमेरिकाधार्जिणी धोरणेच जबाबदार असल्याची टीका केली आहे. तर पाकिस्तानातील भारतद्वेष्टे पत्रकार तालिबानला भारताकडून फूस मिळत असल्याचे आरोप करू लागले आहेत.

अमेरिकेकडून पैसे घेऊन जर पाकिस्तान आमच्यावर हल्ले चढविणार असेल, तर आम्ही भारताकडून पैसे स्वीकारून पाकिस्तानवर हल्ले चढविले, तर त्यात काय चुकीचे आहे, असा सवाल तालिबानच्या नेत्यांनी पाकिस्तानला केल्याचे दावेही प्रसिद्ध झाले आहेत.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानात जल्लोष झाला होता. तालिबानचा वापर करून भारताच्या विरोधात कारस्थाने आखण्याची तयारी पाकिस्तानच्या लष्कराने केली होती. पण तालिबानपासून पाकिस्तानलाच सर्वाधिक धोका असेल, असे पाकिस्तानच्या काही मुत्सद्दी व पत्रकारांनी बजावले होते. ही भीती प्रत्यक्षात उतरू लागली आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानलगतच्या सीमेवर तोफा व रणगाडे तैनात केले आहेत. तालिबान व तेहरिकशी संघर्षाला तोंड फुटण्याच्या स्थितीत असलेल्या पाकिस्तानला राजकीय अस्थैर्याचाही सामना करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी सरकार व लष्कराविरोधात मोहीम छेडल्याने निर्माण झालेल्या या राजकीय अस्थैर्याचे भीषण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत. अशा स्थितीत तालिबान आणि तेहरिकशी संघर्ष करण्याची ताकद सध्याच्या पाकिस्तानमध्ये शिल्लक नसल्याचे दिसू लागले आहे.

leave a reply