अमेरिकेत चिनी नववर्षाच्या कार्यक्रमात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दहा जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात चिनी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. गोळीबार करणारा संशयित हल्लेखोर फरार असून अमेरिकेची प्रमुख तपास यंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गेल्या आठवड्याभरात कॅलिफोर्नियात घडलेली ‘मास शूटिंग’ची ही दुसरी घटना ठरते.

कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजेलिस शहराजवळ असणाऱ्या मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाचे (ल्युनर न्यू इयर) आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त स्टार बॉलरूम डान्स स्टुडिओमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला आशियाई वंशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने रात्री साडेदहाच्या सुमारास सेमी ऑटोमॅटिक रायफलच्या सहाय्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

काही मिनिटे सुरू असलेल्या या गोळीबारात 20हून अधिक जणांना गोळ्या लागल्याचे सांगण्यात येते. त्यातील दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात हल्लेखोर अद्याप फरार असून हल्ल्याचा उद्देशही स्पष्ट झालेला नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. अमेरिकेतील मास शूटिंगच्या घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची गेल्या आठ महिन्यातील ही दुसरी घटना ठरते. यापूर्वी मे 2022 मध्ये टेक्सासच्या शाळेत झालेल्या गोळीबारात 21 जणांचा बळी गेला होता.

दक्षिण कॅलिफोर्नियाचा भाग असणाऱ्या मॉन्टेरी पार्क भागात दरवर्षी चिनी नववर्षाच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन होते. यावर्षीही गेल्या दोन दिवसांपासून चिनी नववर्षानिमित्त कार्यक्रम सुरू होते. अचानक घडलेल्या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता निर्माण झाली असून रविवारी आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मॉन्टरी पार्क भागात आशियाई वंशाच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.

शनिवारची गोळीबाराची घटना ‘हेट क्राईम’चा भाग असू शकतो, असा दावा काही सूत्रांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सदर घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’कडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येते. नवीन वर्षात अमेरिकेत घडलेली ही मास शूटिंगची पाचवी घटना ठरली आहे.

अमेरिकी वृत्तसंस्था व शिक्षणसंस्थांनी तयार केलेल्या अहवालानुसार, 2006 सालानंतर आतापर्यंत अमेरिकेत 534 ‘मास शूटिंग’च्या घटना घडल्या असून त्यात जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

leave a reply