नायजेरियातील ‘अबुजा-कदुना’ रेल्वेवर दहशतवादी हल्ला

- ४८ तासातील दुसरा दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्लालागोस – नायजेरियात अबुजावरून कदुनाकडे जाणार्‍या रेल्वेगाडीवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. सोमवारी दहशतवाद्यांनी रेल्वेमार्गाच्या रुळांवर ‘आयईडी’चा स्फोट घडवून गाडीतील डब्यांवर बेछूट गोळीबार केल्याची माहिती स्थानिक सुरक्षायंत्रणांनी दिली. हल्ल्यादरम्यान अनेक जणांचा बळी गेला असून त्यात गाडीच्या ड्रायव्हरसह रेल्वे कर्मचारी तसेच महिला डॉक्टरांचा समावेश आहे.

नायजेरियात ४८ तासांच्या अवधीत दहशतवादी हल्ला होण्याची ही दुसरी घटना ठरली आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी कदुना विमानतळावर हल्ला चढविला होता. यात विमानतळावरील सुरक्षारक्षकाचा बळी गेला होता. रेल्वेगाडीवर झालेला हल्ला गाडी कदुनापासून अवघ्या २५ किलोमीटर्सवर असताना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कदुना भागात दहशतवादी गटांचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सोमवारी संध्याकाळी सहानंतर कदुनापासून काही किलोमीटर्सवर असणार्‍या रिगासा भागातील रुळांवर दहशतवाद्यांनी ‘आयईडी’चा स्फोट घडविला. स्फोटामुळे थांबलेल्या ट्रेनमध्ये चढून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी गाडीत जवळपास हजार प्रवासी असल्याचे सांगण्यात येते. दहशतवाद्यांनी अनेक प्रवाशांचे अपहरण केले असून त्यात काही परदेशी प्रवाशांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

दहशतवादी हल्लाहल्ल्यानंतर तासाभरात लष्करी तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी गाडीवर ताबा मिळवून उर्वरित प्रवाशांची सुटका केली. गाडीत अनेक मृतदेह सापडले असून त्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. जखमींची संख्याही मोठी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी यामागे फुलानी दहशतवादी गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

कदुना-अबुजा रेल्वेमार्ग ईशान्य नायजेरियातील महत्त्वाचा रेल्वेमार्ग म्हणून ओळखण्यात येतो. गेल्या दोन वर्षात या रेल्वेमार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची ही तिसरी घटना ठरली आहे. या घटनेने नायजेरियन सरकारकडून दहशतवादी गटांविरोधात सुरू असलेल्या लष्करी मोहिमेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. नायजेरियात पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असून त्यात हे वाढते हल्ले प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

leave a reply