मालीतील दहशतवादी हल्ल्यात फ्रान्सच्या दोन जवानांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यातपॅरिस/बमाको – मालीतील मेनाका भागात दहशतवादी संघटनेने घडविलेल्या ‘आयएईडी’च्या स्फोटात दोन फ्रेंच जवानांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. फ्रान्सच्या लष्करावर गेल्या सात दिवसात झालेला हा दुसरा हल्ला ठरला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यात तीन जवानांचा बळी गेला होता. त्या हल्ल्याची जबाबदारी अल कायदासंलग्न दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

शनिवारी ईशान्य मालीतील मेनाका भागात फ्रेंच लष्कराच्या ‘सेकंड हस्सार रेजिमेंट’कडून टेहळणी व गस्त सुरू होती. यादरम्यान एका ‘आयईडीचा’ स्फोट होऊन दोन जवानांचा जागीच बळी गेला, तर एक गंभीर जखमी झाला.दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या जवानांमध्ये य्वोन हुयन या महिला लष्करी अधिकार्‍यांचा समावेश आहे. हुयन मालीत तैनात करण्यात आलेल्या पहिल्याच महिला लष्करी अधिकारी होत्या. ब्रिगेडिअर लुई रिसर असे दुसर्‍या जवानाचे नाव असून, त्याची मालीतील ही तिसरी तैनाती होती.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून दहशतवादाविरोधातील मोहीम पुढे कायम राहिल, अशी ग्वाही दिली आहे. शनिवारच्या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीनंतर मालीत बळी गेलेल्या फ्रेंच जवानांची संख्या ५० वर गेली आहे. २०१३ सालापासून फ्रान्सने मालीतील लष्करी तैनाती सुरू केली असून सध्या पाच हजारांहून अधिक जवान तैनात असल्याचे सांगण्यात येते. फ्रान्सव्यतिरिक्त काही युरोपिय देशांनीही आपल्या लष्करी तुकड्या मालीत तैनात केल्या आहेत.

leave a reply