रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र 24.13 लाख हेक्टरने वाढले

गहू लागवड क्षेत्रात 14.53 लाख हेक्टरची वाढ

नवी दिल्ली – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र 24.13 लाख हेक्टरने वाढल्याची माहिती, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत रब्बी पिकांच्या क्षेत्रात झालेली वाढ ही खूपच समाधानकारक असून गव्हाच्या लागवडी खालील क्षेत्र 14.53 लाख हेक्टरने वाढले आहे. सध्या जगभरात अन्नधान्याच्या टंचाईचे संकट आहे. जगाचे फूड बास्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गहू टंचाई जाणवत असून जागतिक बाजारात गव्हाच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशात वाढलेले गहू पिकाचे लागवड क्षेत्राचे वृत्त अतिशय महत्त्वाचे ठरते.

cultivation of rabi cropsखरिप पिकांच्या काढणीनंतर देशभरात रब्बी पिकांच्या पेरणीने चांगलाच जोर धरला होता. उत्तर भारतात रब्बी पिकांच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आलेे. नुकतेच कृषीमंत्री तोमर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रब्बी पिकांच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी रब्बी पिकांच्या लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

25 नोव्हेंबर रोजीपर्यंतच्या आकडेवारीनुसार रब्बी पिकांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र 358.59 लाख हेक्टर असल्याची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी याच काळात 334.46 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी पीक लागवडीचे क्षेत्र 24.13 लाख हेक्टरने वाढले आहे.

यावर्षी गहू लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत 152.88 लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी याच काळात 138.35 लाख हेक्टर कृषी जमिनीवर गव्हाची लागवड करण्यात आली होती. गहू लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.53 लाख हेक्टरने वाढल्याचे स्पष्ट होते. गहू लागवड क्षेत्रात गेल्या चार वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे.

मातीतील अनुकूल ओलावा, पाण्याची सुधारलेली उपलब्धता आणि देशभरात खतांचा पुरेसा पुरवठा होत असल्याने लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी उत्पादनात विशेषत: गहू उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे.

जगभरात सध्या अन्नटंचाईचे सावट आहे. अन्नाधान्याचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांमध्ये दुष्काळ पडला आहे. त्यातच युक्रेन युद्धाने गहू, खाद्यतेल, तसेच इतर आवश्यक खाद्यान्नाचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. मात्र देशातील अन्नसुरक्षेचा विचार करता भारताने गहू व इतर काही खाद्यान्नाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर रब्बी पीकांचे वाढलेले क्षेत्र महत्त्वाचे ठरते. यामुळे पुढील काळात भारताची अन्नसुरक्षा सुनिश्चित होणार असून अन्नधान्याची निर्यातही भारत वाढवू शकतो.

दरम्यान, यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जलाशयातील स्थिती समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते. 24 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत देशभरातील 143 जलाशयांमध्ये 149.49 अब्ज क्युबिक मीटर पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी असलेल्या उपलब्ध साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण 106 टक्के आहे. तर गेल्या 10 वर्षातील याच काळातील सरासरी उपलब्धतेच्या 119 टक्के आहे. दरम्यान 15-21 नोव्हेंबर या काळातील मातीतील ओलावा बहुतांश जिल्ह्यांत गेल्या सात वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. देशाच्या बहुतांश भागात खतांची मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण समाधानकारक आहे.

leave a reply